समान नागरी कायद्यासाठी प्रबोधन आवश्यक
पिंपरी :
  समान नागरी कायद्याविषयी जाणूनबुजून गैरसमज निर्माण केले जात आहेत. वास्तविक देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेच्या असलेल्या समान नागरी कायद्यासाठी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नंदू फडके यांनी केले.‌

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य ॲड. नंदू फडके ‘समान नागरी कायदा’ या विषयावर बोलत होते. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुदाम साने, असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नीलेश बचुटे यांचा पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ॲड. सतीश गोरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची नूतन कार्यकारिणी धडाडीने काम करीत आहे!” असे गौरवोद्गार काढून, “विधी आयोगाने समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सूचना मागविल्या असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधान हा ग्रंथ विधी शाखेतील अभ्यासकांनी  नित्यनेमाने वाचला पाहिजे; कारण अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये सापडतात!” असे मत व्यक्त केले. ॲड. सुदाम साने यांनी शुभेच्छा दिल्या; तर नीलेश बचुटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ॲड. नंदू फडके पुढे म्हणाले की, “समान नागरी कायदा हा विषय विधी अभ्यासकांसाठी खूप जवळचा अन् जिव्हाळ्याचा आहे. खरे म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याची अनिवार्यता मांडली होती. त्याचवेळी या कायद्याची अंमलबजावणी केली असती तर देशाची प्रगती खूप आधीच झाली असती. भारतीय दंड संहिता आणि अन्य कायदे देशात लागू असल्यावर त्यांच्यासोबत समान नागरी कायदा अस्तित्वात आणायला हवा होता.

शहाबानो खटल्यात तत्कालीन पंतप्रधानांनी अल्पसंख्याक समुदायाच्या दबावाखाली आणि मतांचे राजकारण करीत नवा समांतर कायदा पारित करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत पाचव्या स्थानावर असल्याने या प्रगतीचे अनेक विरोधक अल्पसंख्याकांच्या नावाने खोटे अश्रू ढाळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांना परदेशातील सुरक्षासंबंधीचे कडक कायदे आणि नियम याविषयी जाणीव करून दिली पाहिजे.

समान नागरी कायद्याविरोधात देशात अनेक ठिकाणी अराजक माजवले जाईल; परंतु त्याबाबत नागरिकांनी सतर्क अन् दक्ष राहिले पाहिजे. धर्म हे फक्त साधन असून मानवी कल्याण हे देशातील कायद्यांचे अंतिम ध्येय असले पाहिजे. गणपती उत्सवात, आनंदाच्या प्रत्येक कार्यकमात उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची सनई भक्तिभावाने लावली जाते; तसेच प्रत्येक मुस्लीम हा देशद्रोही नाही, ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूंनी लक्षात घ्यायला हवी!”

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमाला आयोजित होत असून प्रसंगी बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. देवराव ढाळे, माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, माजी अध्यक्ष ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. सुनील कदम, ॲड. सोहम यादव, ॲड. अल्पना रायते आणि इतर वकील बंधू – भगिनी व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी आभार मानले. सामुदायिक वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!