वडगाव मावळ:
एक रुपयात भात पिकाला ४९  हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे,यासाठी बळीराजाने पीक विमा काढायचा आहे,तोही फक्त १ रूपयात. माझ्या शेतकरी बांधवानो हा विमा आपल्याला सहज काढता येईल,त्यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे.

केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC  केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. यात भात, सोयाबीन ,भुईमूग पिकांचा समावेश आहे.

त्यानुसार पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असणार आहे. पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी, वडगाव आर.पी गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्या पिकासाठी किती विमा संरक्षित रक्कम?
(हेक्टरी रुपयांत) हे ही समजून घ्या.
सोयाबीन – ४९०००
भात- ५१७६०
भुईमूग- ४००००

शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक,पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती  प्रियंका पाटील कृषी सहाय्यक, नवलाख उंबरे यांनी दिली.

error: Content is protected !!