उपमुख्यंमंत्री अजित पवार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मावळात
वडगाव मावळ: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मावळ तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्त मावळ तालुक्यातील जनतेशी संवाद साधतील.या मेळाव्यात आमदार सुनिल शेळके मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजणार तत्पूर्वी तालुक्यातील विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटनाला हजेरी लावीत पवार त्यांच्या पठ्ठ्याला निवडून आणण्यासाठी मैदानात ठाकतील असे सुतोवाच मिळत आहे.मंत्रालयात उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील विकासकामांची आढावा बैठक झाली.याच बैठकीत तालुक्यातील विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटनप्रसंगी पवारांनी मावळात यावे असे आग्रहाचे निमंत्रण आमदार शेळके यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीत कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा यांसह कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार शेळके यांनी सोशल मिडियातून दिली.
लोणावळा व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय नुतन इमारतीमधील उर्वरित कामे, शस्त्रक्रिया गृह मोड्युलर करणे, फर्निचर व इतर कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबत निर्देश पवारांकडून देण्यात आले. जांभूळ येथील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे.यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची तात्काळ बैठक आयोजित करुन त्यात मंजुरी मिळणेसाठी उपमुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
तर इंद्रायणी नदीवरील टाकवे व कार्ला–मळवली रस्त्यावरील पुलांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करुन सदर कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री पवारांनी दिल्या आहे.या बैठकीत कान्हे रेल्वे उड्डाणपूल, एडीबी अंतर्गत कान्हे ते सावळा रस्ता यांसह इतर छोट्या – मोठ्या विकासकामांबाबत सखोल आढावा घेत सर्व विकासकामे अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होणेबाबतच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात संपन्न झालेल्या या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसेच जलसंपदा, नियोजन, वित्त, क्रीडा, सा.बां.विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांसह प्रमुख अधिकारी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुण्याचे
जिल्हाधिकारी , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या विकासात्मक दूरदृष्टीतून मावळ तालुक्यासाठी मागील साडेचार वर्षात दिलेल्या निधीतील पायाभूत सुविधांची विकासकामे व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी तमाम मावळच्या जनतेच्या वतीने दादांना निमंत्रित केले.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मावळात येण्याचा शब्द देऊन दादांनी या निमंत्रणाचा स्विकार केला.