भाजेत गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा स्मारकाचे अनावरण 

कार्ला : 

लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या पायथ्याशी व पुरातन अशा भाजे लेणीच्या पायथ्याशी  वसलेल्या भाजे गावामध्ये लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १६ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजे ग्रामस्थांनी  दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील सर्वाधिक उंची असलेला हा एकमेव पुतळा असणार आहे. 

मागील दोन वर्षापासून सदरचा पुतळा बसवण्यासाठी चौथरा बनवण्याचे काम व सोबतच पुतळा बनविण्याचे काम देखील सुरू होते.

 साधारण १८ फूट उंचीचा चौथरा येथे बनवण्यात आला असून त्यावर महाराजांचा १६  फूट उंचीचा पुतळा असणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला. एक मुखाने त्याला मान्यता मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये पुतळा उभारण्याकरिता लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात करण्यात आली. 

लोक सहभागातून हे काम करण्यात आले असून भाजे गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे. सोबतच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीने देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. 

सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. 

पुतळ्याला चारही दिशेने राजमुद्रा बसवण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये याच ठिकाणी शंभर फूट उंचीचा भगवा ध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.

गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता पारंपारिक वेशभूषेमध्ये व पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये भाजे गावांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून  मावळ परिसरामधील तमाम नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होत या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भाजे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सायंकाळी साडेसात वाजता ग्रामस्थांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम व महाराजांचे पोवाडे या ठिकाणी सादर केले जाणार असून तदनंतर सर्वासाठी  महा भंडारा आयोजित करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!