डॉ. शंतनू लडकत कै. सुभाष गोरे स्मृती पुरस्काराने सन्मानित
पिंपरी :
स्वतः अंध असूनदेखील आपल्या दिव्यांगत्वावर मात करून ‘ॲसेसिबिलिटी’ या विषयावर परदेशात प्रबंधलेखन करून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) संपादन करणार्या डॉ. शंतनू लडकत यांना नुकतेच स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने पहिल्या कै. सुभाष गोरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, गणेश तलावाजवळ, निगडी प्राधिकरण येथे स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पिंपरी – चिंचवड महानगरपालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखालील हा सन्मान करण्यात आला. माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, फिटवेल गॅसकिटचे कार्यकारी संचालक चैतन्य शिरोळे, फाउंडेशनच्या संचालिका सोनाली पालांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शैलजा मोरे यांनी, “दिव्यांग मुलांच्या मातांना प्रसंगी आपल्या करियरचा त्याग करावा लागतो. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असला पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र बाबर यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
चैतन्य शिरोळे यांनी स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेत संस्थेच्या कार्याचे आणि सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी यांचे कौतुक केले. संचालिका सोनाली पालांडे यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनच्या कार्याची माहिती देताना आपल्या दिव्यांगत्वावर मात करून समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला सन्मानित करण्याचा मानस व्यक्त केला.
चंद्रकांत इंदलकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली; तसेच नवजात बालकांमधील दिव्यांगतेचा शोध त्वरित घेऊन योग्य उपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते, असे मत व्यक्त केले. मोनाली धबाले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोगले यांनी आभार मानले.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष