“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २५ वा”

तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी।
तें जीवजंतूसी केंवि कळे।।
नामाचे यथार्थ प्रमाण, नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही.
ऐसा नामाचा महिमा। न कळेचि आगमा निगमा।।
किंवा
नामाचे सामर्थ्य नेणे वेदशास्त्र।
शेषाची ती वक्त्रं मौनावली।।

वास्तविक पहाता वेदांचे मंत्रदृष्टे ऋषी अत्यंत सूक्ष्म दृष्टीचे व बुध्दीचे असून सुद्धां ते नामाचा महिमा पूर्णपणे जाणू शकत नाहीत, याचे कारण नाम अत्यंत सूक्ष्म आहे, गगनाहूनही व्यापक आहे व त्यात असणारे अद्भुत सामर्थ्य बुध्दिला अगम्य आहे. म्हणूनच केवळ कौतुकाने तुकाराम महाराज देवाला बजावून सांगतात —
तुझ्या नामाचा महिमा।
तुज न कळे मेघश्यामा।।

तुलसी रामायणात तुळसीदासाने असेच उद्गार प्रभु रामचंद्राला उद्देशून काढले आहेत. ते म्हणतात, —
“हे प्रभु! तू फक्त अयोध्येचा, अहिल्येचा व त्यावेळच्या तुझ्या काही भक्तांचा उद्धार केलास; परंतु तुझ्या रामनामाने त्रैलोक्याचा उद्धार होत आहे”.

तात्पर्य, : नामाचा महिमा जेथे वेदांनाही आकळत नाही तेथे इतर जडबुध्दिच्या स्थूल दृष्टीच्या लोकांना कसा कळणार?

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ।
सर्वत्र वैकुंठ केले असे।।
नारायण नामाच्या-भगवन्नामाच्या पाठाचे फळ म्हणजे सर्व जग वैकुंठस्वरूप दिसणे. कावीळ झालेल्या रोगी माणसाला ज्याप्रमाणे सर्वच पिवळे दिसते, परंतु औषधाने तो रोगी बरा झाल्यावर त्याला जग जसे आहे तसे दिसू लागते, त्याचप्रमाणे, … भवरोगाने ग्रस्त झालेल्या साधकाला जगाचे खरे दर्शन घडत नाही, परंतु नामाच्या उच्चाराने साधक भवरोगातून मुक्त होतो.

✅ परमार्थात जी अनेक साधने आहेत त्यांनी हा भवरोग नाहीसा होण्याऐवजी तो अधिकच जडावण्याचा संभव असतो. परंतु या भवरोगावर एकच रामबाण औषध आहे व ते म्हणजे रामनाम हे होय.

रामनामाच्या नित्य उच्चाराने भगवंताचा प्रसाद प्राप्त होऊन जीवाच्या अंगी ऋतंभरा प्रज्ञा प्रकट होते; (Intuitive knowledge) व तिच्या प्रभावाने भवरोगाचे संपूर्ण निर्मूलन होते. भवरोगाचा नाश झाल्यावर जीवाच्या अंगी म्हणजेच जीवाच्या ज्ञानात स्वानंदाच्या संवेदना उमटू लागतात व त्या संवेदनांनी जीवाच्या सर्व वेदना नाहीशा होऊन तो सुखस्वरूपी स्थिर होतो.

भगवन्नानामाने जी दिव्यदृष्टी प्राप्त होते, त्या दिव्यदृष्टीला सर्व जग म्हणजे प्रभुचा विस्तार, विश्व म्हणजे परमात्म्याचा चिद्विलास, भूतमात्र म्हणजे चैतन्याची शोभा, असा अनुभव प्राप्त होतो.

त्या अलौकिक दृष्टीला सर्वत्र देव-हरी-वैकुंठ भरून राहिलेला आहे, असे दिसू लागते व म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ।
सर्वत्र वैकुंठ केले असे।।

ज्या नामाने हे दिव्य फळ मिळते ते नाम सर्वांनी कंठात धारण करावे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1083*

error: Content is protected !!