“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २६ वा”

मग श्रीहरिला करुणा कशी येईल?

ज्ञानेश्वर महाराज सांगतात–
एक तत्त्व नाम दृढ धरी मना।
हरिसी करु णा येईल तुझी।।

एकतत्त्व जे हरिनाम, ते अंत:करणात दृढ धरल्याने हरिला करुणा येते. परंतु नाम हे एक तत्त्व आहे, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्याचा अर्थ काय ते पहाण्याचा थोडा प्रयत्न करूं.

भगवन्नाम हा दिसायला साधा शब्द किंवा ध्वनी वाटतो, परंतु त्याचे स्वरूप वेगळेच आहे. इतर शब्द विषयांच्या अपेक्षेत वासनेतून स्फुरतात व त्यांची अंतिम परिणती दुःखात्मक दु:खात किंवा दुःखात्मक सुखात होते. भगवन्नाम हे भगवंताच्या अपेक्षेत परब्रह्मातून स्फुरते व त्याची अंतिम परिणति भगवत्प्रेमात होते.

सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास भगवन्नाम म्हणजे “पुरुष-प्रकृतीचा” किंवा “ब्रह्म-मायेचा” किंवा “देवो-देवीचा” काला आहे व ते “भगवद्’रूप” आहे. ज्याप्रमाणे पाणी व वारा यांचा काला म्हणजे लाट; किंवा प्रकाश व त्याचे स्फुरण यांचा काला म्हणजे किरण; किंवा पाणी व उष्णता यांचा काला म्हणजे उकळी.

त्याचप्रमाणे परब्रह्म व परब्रह्माच्या अंगी असणारी शक्ती यांचा काला म्हणजे “भगवन्नाम”. हे नाम परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. शक्तीचा आलंब घेतल्याशिवाय स्फुरण केवळ अशक्य आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर उडी मारायची असेल तर तो आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा प्रथम आलंब घेतो व मग उडी मारतो. त्याचप्रमाणे, भगवन्नाम ”आकाराला” येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व या स्फुरणासाठी आत्मतत्त्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो.

लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे किंवा किरण हा प्रकाशाचे स्फुरण असल्यामुळे तो अंतर्बाह्य प्रकाशरूप आहे, त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे.

म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते “तत्त्वरूप-चैतन्यरूप-ब्रह्मरूप” आहे असे जगाला हाकारून सांगितले.
नामा म्हणे नाम आठवा अवतार।
पूर्णब्रह्म साचार कृष्णरूप।।
नाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म।
नामापाशी नाही कर्म विकर्म।।

अशा या भगवन्नामाला जो कंठात धारण करतो त्याच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडतो.
कंठी धरिला कृष्णमणी। अवघा जनी प्रकाश।।

सर्पाचा राजा जो तक्षक त्याने परीक्षित राजाला दंश करण्यासाठी प्रथम आळीचे लहान रूप धारण केले व एका बोरातून परीक्षिताच्या वाड्यात प्रवेश केल्यावर तेथे त्याने आपले मूळ स्वरूप प्रकट करून राजाला दंश केला. थोड्याफार फरकाने भगवंताचेही असेच आहे. भगवन्नाम हे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. *चौदा भुवनें जया पोटीं।* *तो राहे भक्ताचिये कंठी।।*

(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1085

error: Content is protected !!