“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २५ वा” *तुका म्हणे नाम। चैतन्य निजधाम।।*

नामाचा उच्चार केल्याबरोबर नामधारकाकडे सूज्ञ, सर्वज्ञ, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते, नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते व नामधारकाला भगवत्कृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभु प्रकट होऊन त्याचा आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक योगक्षेम स्वतः वहातो.

भगवंताला स्वत:चे नाम प्रिय आहे त्याचप्रमाणे त्याला आपल्या नामाचा अभिमानही आहे.
तुका म्हणे हा तो नामेचि संतोषी।
वसे नामापाशी आपुलीया।।
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान।
जाईल शरण त्यासी तारी।।

म्हणूनच भगवन्नामाचा कृष्णमणी जो आपल्या कंठात धारण करतो त्याचे परम कल्याण करण्याची सर्व जबाबदारी भगवंत स्वत:वर घेतो.

पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
नारायण हरि उच्चार नामाचा।
तेथे कलिकाळाचा रीघ नाही।।

नामधारकाकडे कलिकाळ वाकड्या नजरेने पाहूं शकत नाही, हा विषय पूर्वी, नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी। या चौदाव्या अभंगात व एकोणीसाव्या अभंगात यमें कुळ गोत्र वर्जियेले। या चरणांच्या अपेक्षेत स्पष्ट केला आहे.

देहावर जरी मृत्यूची सावली पडली तरी सुद्धा हा शांत असतो. याचे कारण नामरूपाने राम जवळ असतो व साधकाला मृत्यूचा जरासुद्धा उपसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर सुद्धा नाम साधकाला सोडीत नाही. *एका जनार्दनी सर्व नाशिवंत।* *एकची शाश्वत हरिनाम।।*

जन्मभर नाम साथ देते इतकेच नव्हे तर मृत्यूच्या बांक्या समयी सुद्धा ते नामधारकाचा त्याग करीत नाही. किंबहुना नामाचे खरे महत्त्व आणि माहात्म्य त्याच वेळेस अनुभवास येते.

कारण यमाची सत्ता देहावर चालते व नामधारक देहाच्या पलीकडे स्वरूपी वास करतो.

अखंड नामस्मरण करणारा नामधारक हा सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन स्वरूपी स्थिर झालेला असतो. आनंदस्वरूप अशा नामाच्या सहवासात तो आनंदाची दीपावली नित्य साजरी करीत असतो. *विठोबाचे राज्य आम्हां नित्य दीपवाळी।।*

(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1082

error: Content is protected !!