आंदर मावळातील मुख्य रस्त्याच्या कामास सुरुवात
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील मुख्य रस्ता असणाऱ्या टाकवे ते वडेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ (सोमवार दि.२२) करण्यात आला.या रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून सुमारे नऊ कोटी पंच्याहत्तर लक्ष एवढा निधी उपलब्ध झाला असुन रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे.या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.या मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

मुख्य बाजारपेठ असणाऱ्या टाकवे येथे आंदर मावळातील विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक यांना रोज ये-जा करावी लागते.निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक देखील येथे येत असतात.अनेकदा डागडुजी करून देखील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.अरुंद रस्ता व मोठे खड्डे पडत असल्याने प्रवास करणे नागरिकांना जिकरीचे झाले होते. पूर्वी या रस्त्याची टाटा कंपनीकडे मालकी असल्याने त्यांच्याकडून तात्पुरती डागडुजी केली जात होती.परंतु आता टाटाने राज्य सरकारकडे हा रस्ता हस्तांतरित केल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे प्रथमच काम होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
  टाकवे ते वडेश्वर अशा सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचे काम या निधीतून करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत रस्ता 3.75 मीटर असुन साईटपट्ट्यांसह रुंदीकरण होणार असल्याने रस्ता 5.50 मीटर होणार आहे.त्यामुळे या भागातील दळणवळणास गती मिळण्यास मदत होईल.रस्त्याच्या कामास ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

● “आंदर मावळच्या विकासाला आमदार सुनिल शेळके यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिल्याने या भागाचा विकास नक्कीच गतीमान होणार आहे.”
– गणेश खांडगे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ.

error: Content is protected !!