नवी दिल्ली:
नवीन संसद भवन इमारतीच्या आत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ‘सेंगोल’ स्थापित केला जाणार आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश सत्तेकडून स्वतंत्र भारताकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियेत हा सेंगोल वापरण्यात आला होता.
नवीन संसद भवन इमारतीचे उदघाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे की राष्ट्रपतींच्या या मुद्दावर सत्ताधारी भाजप आणि तमाम विरोधकांदरम्यान रणकंदनात विरोधकांनी संसद भवन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.तब्बल ९०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन संसद भवन इमारतीच्या आतील वैशिष्ट्यांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. नवीन इमारतीत खासदारांची आसन संख्या वाढवण्यात आली असून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवण्यात येणारे ‘सेंगोल’ या नवीन वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
८८८ सदस्यांची आसन व्यवस्था असलेल्या नव्या लोकसभेत हा समारंभ होईल. या सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि राज्यसभेचे उपसभापती हरीवंश उपस्थित राहणार आहेतसर्व देशांचे राजदूत, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह इमारतीच्या बांधकामात योगदान असलेले रतन टाटा, नव्या इमारतीचे वास्तुशिल्पी बिमल पटेल, मान्यवर खेळाडू, चित्रपट कलावंत व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण पाठविले आहे. या कार्यक्रमात लोकसभाध्यक्षांचे भाषण होईल. पंतप्रधान मोदी यांचेही भाषण होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राजदंड सुपूर्द
नव्या संसद भवनाच्या रविवारी होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिनामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी सेंगोल (राजदंड) सुपूर्द केला. हा सेंगोल नवीन संसद भवनात ठेवला जाणार आहे.
५५० पेक्षा अधिक खासदार अनुपस्थित?
२१ राजकीय पक्षांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असल्यामुळे ५५० पेक्षा अधिक खासदार उपस्थित राहणार नाहीत, असा अंदाज आहे. रालोआच्या सदस्य पक्षांसह २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी होतील.
बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या सर्व १० खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, कुंवर दानिश अली यांच्यासह ४ बसपा खासदारांनी कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.
राजदंडवरून टीकेला शाह यांचे सडेतोड उत्तर
नव्या संसदेत बसविण्यात येणार असलेल्या सेंगोलवरूनही (राजदंड) वाद पेटला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी म्हटले होते की, ‘लॉर्ड माउंटबॅटन, सी. राजगोपालचारी अथवा पं. नेहरू यांनी सेंगोलला सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हटल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ त्याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, काँग्रेसने आपल्या वर्तणुकीबाबत चांगल्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. सेंगोलबाबतचे काँग्रेसचे वक्तव्य निंदनीय आहे.
देशाला नवी संसद मिळत असल्यामुळे लोकांच्या मनात अभिमानाचा भाव दाटून आला आहे. नवे संसद भवन लोकांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी अधिक जोमाने काम करील. लोकशाहीचे हे मंदिर भारताच्या विकासपथास आणखी मजबूत करत राहो तसेच लाखो लोकांना सबल करत राहो.
नरेंद्र मोदी,
पंतप्रधान
विश्वासात घेतले नाही
संसदेची नवीन वास्तू बांधण्यापासून तिच्या उद्घाटनापर्यंत सत्ताधारी पक्षाने विरोधकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे काही विरोधी पक्षांनी उद्घाटनाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली. त्याला माझा पाठिंबा आहे.
शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन