तळेगाव दाभाडे:
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था( NIPHT) तळेगाव दाभाडे कृषी विभाग महाराष्ट्र शासन व पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कृषी पर्यटन, साहसी पर्यटन व गाईड प्रशिक्षण कार्यशाळा एन आय पी एच टी तळेगाव दाभाडे येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. भास्कर पाटील, संचालक एन आय पी एच टी यांनी शेतीबरोबरच आपल्या शेतापासून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अधिकचे उत्पादन कशाप्रकारे मिळवता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक  सुप्रिया करमरकर उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे विभाग, यांनी पर्यटन विभागाच्या विविध योजना, पर्यटनाला प्रोत्साहन तसेच सहासी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जे शासन निर्णय आले त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या मनात उद्भवणारे प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी उत्तर देऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल याबद्दल सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा शब्दात सांगितले. पर्यटन संचालनालय कोणकोणत्या गोष्टी योजना पर्यटन प्रोत्सानासाठी राबवते याबद्दल मार्गदर्शन केले. पर्यटन संचालनालयाचे परवाना काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, काय काय अटी आहेत, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल मार्गदर्शन केले. मावळ मुळशी तालुक्यातील पर्यटनातील संधी तसेच पर्यटनाचे विविध प्रकार याबाबत तज्ञ श्री संजय नाईक, यांनी मार्गदर्शन केले.
साहसी पर्यटन धोरण बद्दल  निखिल कोकाटे यांनी मार्गदर्शन केले व सुरेंद्र शेळके यांनी साहसी पर्यटन करताना काय काय काळजी घ्यावी, सर्व विभागांनी मिळून जर एकत्र प्रयत्न केला तर साहसी पर्यटनाला लागणाऱ्या परवानगी व परवाने अत्यल्प कालावधीत मिळू शकते याबाबत शासनाला पाठपुरावा करत असल्याबाबत सांगितले. साहसी पर्यटन करताना कोणकोणत्या काळजी घ्यायची त्याबद्दल  कुठे प्रशिक्षण मिळते या संस्थांबाबत श्री शेळके आणि कोकाटे यांनी शेतकऱ्यांना अवगत केले. रूपक साने यांनी होम स्टे बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
  कृषी विभागाच्या विविध योजना बाबत  तसेच मावळातील पर्यटन विकासाच्या विविध संधी बाबत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या विविध योजना तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कशाप्रकारे मावळाचा पर्यटनाचा विकास करता येईल याबाबत संताजी जाधव कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी मार्गदर्शन केले. महावितरण चे राजेश जांभुळकर यांनी कृषी पर्यटनाबाबत महावितरणचे काय धोरण आहे याबाबत सांगितलं. मावळ तालुक्यातील शिळीब येथील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप यांनी आपल्या ओसाड पडलेल्या बारा एकर जमिनीमध्ये कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने कृषी पर्यटन केंद्र उभारले याचे सर्वांना अनुभव कथन केले. 
  रानफुला ऍग्रो टुरिझम व एडवेंचर चे मालक श्रीकांत चव्हाण यांनी त्यांनी उभारलेल्या महाराष्ट्रातील सर्वांत लांब झीप लाईन व भारतातील सर्वात लांब पाण्यावरून जाणाऱ्या झीप सायकलिंग बाबत सांगितले तसेच सर्व शेतकरी एकत्र येऊन कशाप्रकारे आपला कृषी पर्यटन व्यवसाय वाढवू शकतील याबद्दल मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात मावळ मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबरच माजी सभापती एकनाथराव टिळे, पिडीसीसी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी भाग घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रामदास वाडेकर तर कार्यक्रमाचे नियोजन एन आय पी एच टी चे विश्वास जाधव, यतीन गुंडेकर, आत्म्याचे राहुल घोगरे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निकेतन धापटे व सुवर्णा मेंगडे कृषी विभागाचे नवीनचंद्र बोराडे, दत्तात्रय घोगरे, अंकुश पारधी, मीनाज शेख यांनी केले.
  या  प्रशिक्षणास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कृषी पर्यटनावर अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम तालुक्यात घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खूप आनंद झाला.

error: Content is protected !!