आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन
सुदुंबरे:
महाराष्ट्र शासन कृषि विभाग,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे – सुदवडी येथे “कांदा उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक (आत्मा ),पुणे श्रीमती.पूनम खटावकर व तालुका कृषि अधिकारी,मावळ दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या किसान गोष्टी  कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर चे संचालक मा.डॉ. विजय महाजन,आत्माचे बीटीएम राहुल घोगरे,मंडळ कृषि अधिकरी नंदकुमार साबळे,कृषि पर्यवेक्षक नविनचंद्र बो-हाडे,कृषि सहाय्यक श्रीमती स्वाती घनवट तसेच कृषि मित्र राजाराम खेडेकर,दत्तात्रय गाडे ,आबासाहेब काशीद उपस्थित होते.
  राहुल घोगरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
      यानंतर श्री.डॉ विजय महाजन यांनी कांदा पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना कांदा पिकाच्या हंगामानुसार वेगवेगळ्या जातींची निवड,गादिवाफ्यावर रोपवाटिका कशी तयार करावी,रोपांची पुर्नलगावड करताना घ्यावयाची काळजी,लागवडीचे अंतर,खतांची मात्रा,आंतरमशागत,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ,कीड व रोग नियंत्रण इ.बाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले.
      नविनचंद्र बो-हाडे यांनी  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना (PMFME) बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर श्री.नंदकुमार साबळे यांनी रब्बी हंगाम नियोजनाबद्दल माहिती देऊन कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
   या कार्यक्रमासाठी सुदवडी,सदुंबरे या गावातील कांदा उत्पादक शेतकरी  बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती स्वाती घनवट व  राहुल घोगरे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती स्वाती घनवट यांनी आभार मानले.

error: Content is protected !!