सोमाटणे:
पिकांची उत्पादकता वाढीसाठी सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि उत्पादन वाढविणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलामध्ये वाढ होऊन ते नवीन उमेदीने नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्यांच्यापासून इतर शेतकरी प्रेरणा / मार्गदर्शन घेऊन आपले उत्पादन वाढवतील.या उद्देशाने राज्यात विविध तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढीलप्रमाणे पीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
………………………………..
पीक स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई,जवस असून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१
…………………………………………..
असे असेल बक्षीसाचे स्वरुप  :-
ही स्पर्धा राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकापातळीवर होणार आहे. पिकानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बक्षीस दिले जाणार आहे.
   * तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे 2 हजार असे राहणार आहे.
  * जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार रुपये राहणार आहे.
  * विभागीय पातळीवर पहिले 25 हजार, द्वितीय 20 हजार आणि तिसरे 15 हजार रुपये राहणार आहे.
   *राज्यस्तरावर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार आणि तिसरे बक्षीस हे 30 हजार राहणार आहे.
…………………………….
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या अटी

* पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.
पीक स्पर्धेमध्ये सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
*स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असावी.
* जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे.
* स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
* पीक स्पर्धा तालुक्यात सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते. 
* तालुक्यात स्पर्धा घेण्यासाठी ते पीक घेणाऱ्या स्पर्धकांची किमान आवश्यक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ आहे. यापेक्षा कमी प्रवेश अर्ज आल्यास पीक स्पर्धा रद्द करण्यात येते.
  * पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्याच्या शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
  *पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाने स्पर्धेतून माघार घ्यावयाची झाल्यास, कापणीपूर्वी १५ दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकाऱ्यास लेखी कळवावे.
* स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये प्रति अर्ज
…………………………………………..
तालुका कृषी अधिका-यांकडे करा अर्ज-
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये प्रति अर्ज असून पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छेना-या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यांतील अर्ज भरून, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व ७/१२ , ८-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागद पत्रांची पूर्तता करून संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावेत.
…………………………………………….
स्मिता कानडे ( कृषी सहाय्यक पाचाणे) :- मावळ तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामातील भातपीक स्पर्धेत सहभाग घेऊन विभागीय पातळीवर आपली उत्पादकता सिध्द करून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविले आहेत.त्याच प्रमाणे रब्बी पिक स्पर्धेत भाग घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेऊन रब्बी हंगामात सुध्दा क्रमांक मिळविण्यासाठी शेतक-यांनी पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा.

error: Content is protected !!