करंजगाव( अथर्व अग्रहारकर):
नाणे मावळ भागात पावसाने उघडीप दिली असल्याने भात कापणी व झोडणीला प्रचंड वेग आला आहे. यावर्षी पावसाने चांगला प्रतिसाद दिला असल्याने व पोषक असल्याने खरीप भात पीक चांगले आले आहे. त्यामुळे नाणे मावळातील बळीराजा सुखावला आहे.
यावर्षी जून महिना संपताना जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या लागवडीची कापणी सुरु झाली आहे तसेच झोडणीही वेग धरू लागली आहे. बळीराजा सकाळी लवकर भात कापणी करत असून दुपारपर्यंत झोडून तयार ठेवत आहे.
ह्यावर्षी मजूर टंचाई भासत आहे त्यासोबत गगनाला भिडलेले मजुरीचे दर ह्यामुळे शेतकरी स्वतःच भात झोडताना दिसत आहे.
नाणे मावळात भात कापणी झाली कि शेतकरी ओलीवर हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची पेरणी करत असतात. त्यामुळे भात पिकाची झोडणी व कापणी लवकरात लवकर संपवून शेत पुन्हा तयार करायची लगबग सुरु झाली आहे. नाणे मावळातील करंजगाव, नाणे, गोवित्री, उकसान, नवीन उकसान गावातील भातपीक जोमात वाढले आहे.

error: Content is protected !!