अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर जोरदार आंदोलन
मुंबई:
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर निदर्शने केली. मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधन भत्ता, प्रवास भत्ता, सेवा समाप्ती लाभ आदी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा देणे, खाजगीकरण रोखणे, ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
  महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिष्टमंडळाला आमंत्रित केले व सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात एम ए पाटील, शुभा शमीम, भगवानराव देशमुख, निशा शिवुरकर, माधुरी क्षीरसागर, जीवन सुरुडे, सरिता कंदले यांचा समावेश होता. माननीय मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली व आझाद मैदानावर स्वतः येऊन मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून लवकरच ती जाहीर करण्याची ग्वाही दिली.
कृती समितीने या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याकरिता शासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत मानधन वाढीचा आदेश न निघाल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा व अधिवेशनात सर्व प्रश्नांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला संपाची नोटीस देऊन संपावर जाण्याची तयारी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
हे आंदोलन एम ए पाटील, शुभा शमीम, कमल परुळेकर, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले.

error: Content is protected !!