आठ वर्षीय चिमुकल्याने पूर्ण केले रमजानचे तीस उपवास
पिंपरी: (प्रतिनिधी सुरेश शिंदे)
मुस्लीम धर्मात रमजान महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दररोज उपवास केला जातो. या निर्जल उपवासांना फार महत्व आहे. पिंपरी-चिंचवड मधील आदि जमीर मुल्ला या आठ वर्षांच्या चिमुकल्याने यावर्षी संपूर्ण महिनाभर उपवास पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्याने केलेल्या उपवासांबाबत त्याचे कौतुक केले जात आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील
पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे मार्केटिंग हेड जमीर मुल्ला यांचा मुलगा तर सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुल्ला यांचा नातू आदी मुल्ला याने यावर्षी प्रथमच रमजानचे उपवास केले. पहिल्याच वर्षी त्याने सर्व ३० उपवास पूर्ण केले. कोवळे वय आणि कडक उन्हाळा अशा परिस्थितीत त्याने हे उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इस्लामिक कॅलेंडर नुसार नववा महिना रमजानचा असतो. या महिन्याला मुस्लीम समाजात सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास केला जातो. सूर्यास्त झाल्यानंतर रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते.
इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.
आदिने देखील दररोज दिवसाचे १४ तासांहून अधिक काळ उपवास केला. शाळेची दिनचर्या सांभाळून त्याने कुठेही न ढळता हे उपवास पूर्ण केले आहेत. त्याने केलेले व्रत समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.