अमृतमंथन
वंदन तुला यमराजा
यमराज हा खरोखर सर्व विश्वाचा राजा आहे. सर्व जगावर त्याची निरंकुश ‘सत्ता सुखेनैव चालत आहे.या राजाचा दरारा असा विलक्षण की नुसते त्याचे नांव काढले तरी सर्व लोक डरतात, टरकतात व थरथर कांपतात मग हे राजाधिराज प्रत्यक्ष दारांत येऊन थडकले तर लोकांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
धोतराचा पितांबर झाला तर नवल वाटण्याचे कारण नाही.वास्तविक,हे यमराज जगातील लोकांना जेवढे भयानक वाटतात तेवढे ते भयानक मात्र नाहीत,ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.या प्रचंड विश्वाची सुरेख सोय लावण्याचे सुरेख काम हा यमराज इमानेइतबारे करीत असतो. ज्याप्रमाणे आपल्या कामात निष्णात असलेला एखादा वाकबगार सोनार जुने दागिने आटवितो व नवे दागिने तयार करतो;त्याप्रमाणे हा यमराज सर्व जुने नाम-रूप आकार,अलंकार मृत्यूच्या मुशीत आटवितो.
त्यांना नवीन आकार देऊन पूर्ण नूतन असे नवीन नामरूप अलंकार निर्माण करतो किंवा एखादा सर्पराज ज्याप्रमाणे जुनी कात टाकतो व नवीन कात धारण करतो त्याप्रमाणे हा यमराज जगाला जुनी कात टाकायला लावून नवीन कात धारण करावयास लावतो.हा यमराजाचा एकंदर खेळ पाहिला की, आपल्याला लहानपणी खेळलेला खो-खोचा खेळ आठवतो.या खेळांत एकाने दुसऱ्याला ‘खो’ द्यायचा असतो व ‘खो’ दिल्यावर पहिल्या माणसाला उठवून त्याची जागा दुसरा ‘खो’ देणारा घेतो.सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर या जगात हा खो खोचा खेळ फार पुरातन काळापासून चालत आलेला आहे.
आमच्या खापर पणजोबाना पणजोबानी ‘खो’ दिला, पणजोबाना तसाच ‘खो’ दिला आजोबांनी व त्यांची जागा आजोबांनी घेतली.आमच्या पित्ताजीनी वडिलांना ‘खो’ दिला व आता आमच्या सुपुत्राकडून आम्हाला ‘खो’ मिळतो याची आम्ही वाट पाहून आहोत.वास्तविक,किती गंमत व मौज आहे या खेळात.परंतु दुर्दैव मात्र असे की ‘वेळ’ आली की हा खेळ आहे हे सर्व विसरतात.या खेळामुळे जगाची जी सुरेख सोय झाली आहे ती जर लक्षात घेतली तर “सोय करतो तो सोयरा” या म्हणीप्रमाणे हे यमराज सर्वांचे खरेखुरे सोयरे आहेत असे म्हणणे भाग आहे.ही सोय नसती तर जगाची काय भयंकर व सोचनीय अवस्था झाली असती याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर कांटाच उभा रहावा.
सहज कल्पना करा की आपल्या दोन खोल्यांच्या ‘ऐसपैस’ जागेत आपले खापर पणजोबा,पणजोबा,आजोबा वगैरे ‘थोर’ मंडळी बसली आहेत व ती सर्व मंडळी दम्याने जर्जर होऊन खोक-खोक खोकत आहेत, प्रत्येकाच्या पुढ्यात पिकदाणी आहे व त्या सर्वांच्या कफाला उबळ येऊन अमाप पीक आले आहे. त्यांत आपण,आपली बायको, आपली मुले विहार करीत आहेत. हा विहार चालू असतानाच एका बाजूने वरील थोर मंडळी खोकत आहेत व मुले रडत ओरडत आहेत. असे वाटते की वरील चित्र नुसते कल्पनेने डोळ्यांसमोर आणताच वाचकांच्या डोळ्यांसमोर अक्षरश: काजवे चमकायला लागले तर त्यांत नवल नाही.
जन्मभर अनंत काळ खोक खोक खोकायला लागून स्वतःला व इतरांना सळो की पळो करून टाकण्यापेक्षा ‘वेळीच’ दुसऱ्याकडून ‘खो’ घेऊन खो-खोचा खेळ खेळणे बरे नव्हे काय? जगातील सर्व पदार्थ,वनस्पती, प्राणी व माणसे हा खोखोचा खेळ कळत नकळत खेळतच आहेत आणि म्हणूनच हे जग जुने,पुराणे, जर्जर,कुरूप व भेसूर न दिसता, सदैव नूतन सुंदर व मंगल दिसत आहे.अशा या जगाच्या प्रेमळ सोयऱ्याला राजाला वंदन असो!
यमराज व त्याने केलेली मृत्यूची सुंदर सोय यांच्याकडे आणखी एका वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पहाणे आवश्यक आहे.आज ना उद्या यमराजाकडून अगत्याचे आमंत्रण येणार हे निश्चित आहे.हे आमंत्रण इतके प्रेमाचे व आग्रहाचे असते की, एक क्षण सुद्धा उशीर झाला तरी या यमराजाचा जीव अगदी कासावीस होतो.तुम्ही ज्या अवस्थेत असाल त्याच अवस्थेत तात्काळ त्याच्या आमंत्रणाला होकार दिला पाहिजे. अर्थात्,तुमच्या होकाराची किंवा नकाराची तो बिलकूल वाट पहात नाही.हे आमंत्रण म्हणजे “तुमची इच्छा असो किंवा नसो गेलंच पाहिजे” या स्वरूपाचे असते.तुम्ही जर धोतर नेसत असाल तर तुमचे सर्ण पूर्ण झाले की अपूर्ण याचा विचार यमराज करीत नाही.
चलायचे म्हणजे चलायचे, तेथे appeal नाही.अर्ज-विनंत्या सर्व केराच्या टोपलीत.एकदा एक डॉक्टर महाशय पत्ते खेळावयास बसले होते.पत्त्याचा डावही रंगात आला होता परंतु यमराजांना एकदम एकाएकी या डॉक्टरची आठवण झाली व त्याला आमंत्रण गेले.बदामाचा एक्का टाकण्यासाठी डॉक्टरांचा हात वर गेला तो खाली आलाच नाही.असा हा राजांचा एकंदर खाक्या आहे.हा सर्व प्रपंच करण्याचे कारण असे की, यमराजाचा हा विलक्षण खाच्या लक्षात घेतला तर एक गोष्ट निश्चित ठरते की,या स्वारीला कोणत्या वेळी कोणावर स्वारी करण्याची लहर येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणे जरा कठीणच आहे.
आपल्यासमोर अनेक लोकांना यमराजाकडे जातांना पहाण्याची संवय झाल्यामुळे आपण मात्र असा सोयीचा विचार करतो की, याराजांचे आमंत्रण येणार ते इतरांना आपल्याला नाही.असा सोयीचा विचार करून सुद्धा एक दिवस अचानक यमराजाचे गैरसोय करणारे आमंत्रण येते तो भाग वेगळा वास्तविक यमराजाची ‘कृपादृष्टी’ आपल्याकडे वळणार नाही असा सोयीचा विचार करणारे लोक प्रत्यक्षात मात्र स्वतःची व इतरांची फारच गैरसोय करून जातात असा सार्वत्रिक अनुभव आहे.
वास्तविक,यमराजाची कृपादृष्टी कोणाकडे केव्हां वळेल हे संपूर्ण अज्ञात असल्याने सदैव सावध असणे हाच सर्वात पोक्त व सर्वांना उपयुक्त असा मार्ग आहे. “सदैव सावध असणे” याचा सरळ अर्थ असा की,आमंत्रण आल्याबरोबर प्रयाण करण्यास आनंदाने सिद्ध असणे हा होय.मृत्यू म्हणजे हा इहलोक सोडून परलोकी गमन करणे.ज्याप्रमाणे परगांवी जाण्यासाठी आपण आपला गांव सोडून प्रवासाला निघतो,त्याप्रमाणे मृत्यू म्हणजे हा लोक सोडून परलोकी जाण्यासाठी केलेला प्रवास आहे.
प्रवास करणारे दोन प्रकारचे लोक असतात.कांही लोक प्रवासाची पूर्वतयारी कांहीच करीत नाहीत,तर दुसरे लोक प्रवासाला निघण्यापूर्वी योग्य व जरूर ती सर्व पूर्वतयारी आधीच करून ठेवतात. तिकीट रिझर्वेशन,सामानाची बांधाबांध,गाडी सुटण्याची नेमकी वेळ माहीत करून घेणे वगैरे सर्व गोष्टी प्रवासाची पूर्व तयारी या स्वरूपात मोडतात.पहिल्या प्रकारच्या लोकांना गडबड,गोंधळ, तंटे-बखेडे नुकसान वगैरे प्रकारांना तोंड द्यावे लागते.
याच्या उलट दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा प्रवास अगदी शांतपणे,समाधानाने व सुखात होतो.परलोकीच्या प्रवासाला सुद्धा हाच नियम लागू आहे.कोणत्याही क्षणी यमराजांना आपल्याला बोलावणे पाठविण्याची लहर येणे शक्य असल्यामुळे जो वर्तमान क्षण आपण जगतो तोच क्षण तेवढा आपला,बाकीचे क्षण किंवा काळ यावर आपला कांहीही ताबा नाही असा सुविचार करणे आवश्यक आहे.गेलेले क्षण किंवा काळ हा भूतकाळ म्हणून आपल्या हातांतून केव्हांच निसटलेला असतो.येणारे क्षण किंवा भविष्यकाळ म्हणजे उधारीची गोष्ट त्यावर आपला काडीचाही हक्क पोहोचत नाही.उरला वर्तमान काळ म्हणजे केवळ वर्तमान क्षण हा क्षण तेवढाच खऱ्या अर्थाने आपला म्हणून आपल्याला त्याच्यावर हक्क सांगता येतो.
परंतु प्रत्यक्षांत मात्र क्षण इतका निसटता आहे की, “हा क्षण माझा” असे म्हणेपर्यंत तो भूतकाळात निघूनही गेलेला असतो.म्हणूनच जो क्षण आपण जगतो तो क्षण किंवा दिवस हा आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण किंवा दिवस अशी धारणा करूनच जीवन जगणे हे खऱ्या अर्थाने सूज्ञपणाचे लक्षण होय. त्याचप्रमाणे परलोकीच्या प्रवासाची सुद्धा वरील धारणा ही पूर्व तयारी होय.आपले मन हे घड्याळाच्या लंबकासारखे आहे.हा लंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व तेथून परत पहिल्या टोकापर्यंत असा सारखा फिरत असतो.
  त्याचप्रमाणे आपले मन भूतकाळातून भविष्यकाळात व भविष्यकाळातून परत भूतकाळात असे सारखे हिंडत असते. वर्तमानकाळात रहाणे ही गोष्टच जणू मनाला अवगत नाही. भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता अशा कात्रीत आपले मन अडकलेले असते.अशा कात्रीत सांपडलेल्या मनाला शांती व समाधान यांचा कधीच लाभ होत नाही.परंतु या दोन्हींना बाजूला सारून जो केवळ वर्तमानकाळात जगू शकतो त्याला मात्र शांती व समाधान प्राप्त होते. म्हणून “जो क्षण जगतो तो शेवटचा” अशा धारणेने जेंव्हा आपण जीवन जगू लागतो तेव्हांच खऱ्या अर्थाने आपण वर्तमानकाळ जगायला लागतो.या जगण्यात प्रकर्षाने आठव असतो तो वर्तमानकालीन गोष्टीचा व प्रकर्षाने विसर असतो तो भूतकालीन गोष्टींचा.कांही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या तर भविष्यकाळ हा त्याच्या जाणीवेच्या प्रांतात येतच नाही.अशा मनाच्या स्थिर अवस्थेत तो शांती-सुखाचा उपभोग वर्तमान काळांत सदैव घेत असतो.
  याची कारणमीमांसा आणखी एका दृष्टिकोनातून पहाणे महत्वाचे आहे.”जो क्षण जगतो तो शेवटचा” अशी एकदा मनाची पक्की धारणा झाली की तो माणूस परलोकीच्या प्रवासाची तयारी आधीच करून ठेवतो.आपल्या बायका मुलांसाठी योग्य ती जमेल तितकी तरतूद आधीच करून ठेवणे,इतरांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवणे,तंटे-बखेडे यापासून दूर रहाणे,आपला कोणालाही ताप होणार नाही अशा प्रकाराने संसारात रहाणे,वगैरे तत्सम गोष्टी तो दक्षतेने साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे वर्तमानकाळ जगत असताना प्रत्येक रिकामा क्षण ईश्वर स्मरणात भरीत रहाण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धां परलोकीच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.रिकामे क्षण ईश्वर स्मरणात घालविण्याचा सतत अभ्यास केल्याने माणसाचे मन यमराज येण्यापूर्वीच एका बाजूने सर्व बंधनातून व दुःखातून मुक्त झालेले असते व दुसऱ्या बाजूने भगवंताशी युक्त किंवा भक्त अवस्थेत नांदत असते.
  असा हा मुक्त भक्त जेव्हां परलोकी प्रयाण करतो तेव्हां तो न चुकता ज्या स्थानाप्रत पोहोचतो ते स्थान म्हणजे “सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर” असे भगवंताचे चरण हे होय.असा हा मुक्त भक्त प्रवासाचे रिझर्वेशन तर करतोच पण मुक्कामाचेही रिझर्वेशन आधीच करून ठेवतो.वर उल्लेखिलेली दिव्य अवस्था प्राप्त करून घेणे हे दोन चार दिवसांचे काम नाही. त्यासाठी ‘आतापासून’ तयारी करावी तेव्हां खरोखरीचा शेवटचा क्षण उजाडतो,त्यावेळी, “आम्ही जातो आमुच्या गांवा । आमुचा राम राम घ्यावा” अशा थाटात सर्वांचा आनंदाने निरोप घेता येतो.
*सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!