तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के.पाटील निलंबित 

तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.मुख्याधिकारी पाटील यांनी १ जूनला मद्यधुंद अवस्थेत कार अपघात केला.तसेच कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आक्षेपार्ह असभ्यपणाचे अशोभनीय वर्तन केले

या प्रकरणात राज्याचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी निलंबन केले असल्याचा आदेश दिला.मुख्याधिकारी एन के पाटील यांच्याविरुध्द दि.१ जूनला स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १३ ईसी ९६३३ने मानवी जिवितास धोका होईल अशा प्रकारे भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २ कारला धडक दिली.

व अपघात करुन पळून गेल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यानुसार एन के पाटील यांच्या रक्ताचे नमूने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, गणेशखिंड, पुणे यांनी तपासले असता, त्यांच्या तपासणी अहवालामध्ये “The blood contained ०.०४४ gms (Forty Four mgs.) Percent. w/v of Ethyl Alcohol” असे नमुद केले आहे. तसेच, मुख्याधिकारी एन के पाटील यांचे महिला अधिकारी व कर्मचारी यांचेशी असलेले वर्तन आक्षेपार्ह, असभ्यपणाचे व अशोभनीय असल्याचे जिल्हाधिकारी, पुणे, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्य अहवालात नमुद केलेले आहे.

 मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या विरुद्ध दाखल प्रथम खबर अहवालातील (FIR) गांर्भिय पाहता तसेच पाटील यांचे नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलणे व असभ्य वर्तन करणे या बाची विचारात घेता, पाटील यांच्या वर्तणूकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांच्या या वर्तणूकीमुळे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 3 चा भंग केला आहे.

 मुख्याधिकारी पाटील यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 4, पोटकलम (1) (अ) च्या तरतूदीनुसार आदेशाच्या दिनांकापासून निलंबित झाल्याचे मानण्यात आले आहे आणि ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील. आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत मुख्याधिकारी पाटील यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे राहील, पाटील यांना शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

 निलंबन आदेश अस्तित्वात राहतील त्या कालावधीसाठी मुख्याधिकारी पाटील यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, 1981 च्या नियम 68 व 69 अन्वये निर्वाह भत्ता व त्यावरील भत्ते जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यालयामार्फत देय राहील.

निलंबन कालावधीत पाटील यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 16 मधील तरतूदीनुसार, खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. पाटील यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा काही व्यवसाय केला तर गैरवर्तणूकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येऊन त्याप्रमाणे त्यांचेविरुध्द कारवाई करण्यास ते पात्र होतील अशा परिस्थितीत निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावतील.

error: Content is protected !!