दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे: प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर
‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम
पिंपरी :”दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे असते! मीना शिंदे या मराठीत दिवान लिहिणार्या आद्य महिला गझलकार आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे!” असे गौरवोद्गार आद्य मराठी गझल संशोधक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी वाकड, पिंपरी येथे काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमात ज्येष्ठ गझलकारा मीना शिंदे यांना सन्मानित करताना सांगोलेकर बोलत होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना मीना शिंदे यांनी, “ज्ञानोबा – तुकोबा यांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी ‘साहित्यिक येता घरा, तोचि दिवाळी – दसरा” अशी भावना माझ्या मनात आहे. सुमारे चोवीस वर्षांपासून शब्दधन या संस्थेशी माझे ऋणानुबंध आहेत. वडिलांकडून वाचनाचा तर श्वसुरांकडून सामाजिकतेचा वारसा मला लाभला.
एक सारथी म्हणून आजपर्यंत पतीची साथ मिळाली आहे!” असे मनोगत व्यक्त करून, “मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळती
तेजोमय तार्याचे नेत्र असे पाझरती!”ही गझल सादर केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आय. के. शेख यांनी, “आली पालखी आली दारी…” ही भक्तिरचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंचाची चोवीस वर्षांची वाटचाल कथन केली.
रघुनाथ पाटील यांनी,”कातरवेळी कातर कातर स्वर माझा ये ना सजना कायापालट कर माझा!”या मीना शिंदे लिखित गझलेचे ओघवते रसग्रहण केले. मधुश्री ओव्हाळ यांनी वंदना विटणकर लिखित “शोधिशी मानवा…” या गीताचे गायन केले करून कार्यक्रमात रंगत आणली. रेखा कुलकर्णी यांनी मीना शिंदे यांची गझल सादर करून मैत्रीच्या आठवणी जागविल्या तर शोभा जोशी यांनी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, जयश्री गुमास्ते, संजय शिंदे यांनी संयोजन केले. तानाजी एकोंडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.