रविवार, ०७ जुलै ला पिंपरीत ʼभिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवʼ

पिंपरी:रविवार, दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पिंपरी येथे भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कवी विजय वडवेराव यांनी २०१४ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मातीच्या ढिगावर बसून लिहिलेली ‘भिडेवाडा बोलला’ ही कविता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. 

त्यामुळे देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्रीशिक्षणाचे उगमस्थान आणि स्त्रीमुक्ती चळवळीचे केंद्रबिंदू ठरलेल्या भिडेवाडा या ऐतिहासिक वास्तुबद्दल तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल कवींनी अभ्यास करून कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हावे या उद्देशातून मार्च २०२४ मध्ये ‘भिडेवाडा बोलला’ या राष्ट्रीय काव्यस्पर्धेचे पुण्यात विजय वडवेराव यांनी आयोजन केले होते. 

त्याला समाजातील सर्व स्तरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता पिंपरी – चिंचवड येथे भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर काव्यमहोत्सवासाठी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांतून तसेच विदेशातूनही सुमारे दोनशेहून अधिक कवींनी सहभाग नोंदवला आहे. उपस्थित राहणारे सर्व कवीच या महोत्सवाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून नि:शुल्क सहभाग हेच या ऐतिहासिक काव्यमहोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे, अशी माहिती आयोजक आणि प्रायोजक विजय वडवेराव यांनी दिली आहे.

error: Content is protected !!