जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आकुर्डी, – आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस तसेच नाना काटे राजू दुर्गे, भीमा बोबडे, नामदेव ढाके, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या मिरवणुकीत खासदार बारणे विजय रथावर आरूढ झाले होते. सुरुवातीला काही काळ छोटा नातू राजवीर यालाही त्यांनी कडेवर घेतले होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत
सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही विजयरथावर बारणे यांच्या समवेत आरूढ झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आकुर्डी गावातील चौकात माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी क्रेनच्या साह्याने विजय रथावरील मान्यवरांना भव्य पुष्पहार घातला व पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री शिंदे व अजितदादा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत अभिवादन केले.
प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. धनुष्यबाण चिन्हाची प्रतिकृती हाताने उंचावत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ तसेच ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ची घोषणाही दिली. मिरवणुकीच्या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सुमारे एक तास मिरवणुकीत सहभागी होऊन मुख्यमंत्री व अन्य मान्यवर पुढे मोटारीने पीएमआरडीए कार्यालयाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील हे देखील आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पीएमआरडीए कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना बारणे यांनी धन्यवाद दिले. बारणे यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली होती.
मताधिक्याचा नवा विक्रम करणार – बारणे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या निवडणुकीत आपण 2019 मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
परिवाराकडून सदिच्छा
उमेदवारी अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी थेरगाव येथील निवासस्थानी खासदार बारणे यांना पत्नी सरिता, बहिण रुक्मिणी कस्पटे, अश्विनी जाधव, सुना स्नेहा प्रताप बारणे, नीता महेश बारणे, कावेरी नीलेश बारणे यांनी औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी खासदार बारणे यांचे पुत्र प्रताप व विश्वजीत तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.