मृत्यूला त्याच्या कष्टाची का नाही आली  कीव ?
कामशेत येथे मध्यमवर्गीय परिस्थितीत जगणारे प्रामाणिक पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर निधन झाले. एक व्यक्तीचा मृत्यू म्हणून जग काही दिवसांत हे विसरून पुन्हा आपल्या वळणावर लागेल.
पण हे एका व्यक्तीचे निधन नाही. तर त्याच्या मागे असणाऱ्या तीन व्यक्तीच्या जीवनाच्या पुढील आयुष्यात खडतर असणाऱ्या जीवनाच्या प्रवासातील मोठा धक्का आहे. चंद्रकांत यांच्या मागे पत्नी व पाच व तीन वर्षांची मुलगा व मुलगी आहे.आपला बाप देवाघरी गेला हे फक्त ऐकलेल्या या दोन लेकरांची काय घालमेल झाली असेल याची कल्पना न केलेली बरी.
खेळात मग्न असणाऱ्या बाल वयात त्यांच्यावर किती मोठा आघात झाला आहे. नेमके काय घडले हेही नकळण्या इतपत त्यांच वय आहे.चंद्रकांतजी एका झोपडी वजा तुटक्या जागेत कामशेत येथे  लॉड्री  व्यवसाय करत असत त्यातून मिळणाऱ्या इतर वेळेत आपल्या कौशल्य व अभ्यास व इतर गुणांमुळे त्यांनी मोठ्या दैनिकात वार्ताहर म्हणून नाव कमावले होते, परिस्थिती बिकट असतांना प्रामाणिक राहत त्यांनी काम केले. आज मात्र एक कामानिमित्त जळगांव, त्यानंतर धुळे येथून ते नाशिक येथे उतरून कामशेत कडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्या भावाने सांगितले ,” त्याप्रमाणे चंद्रकांत यांना दुपारी साडे तीन वाजताच रस्त्यावर भोवळ आली व त्याच ठिकाणी त्यांनी प्राण सोडला .
पण शहरात अश्या गोष्टी लक्षात येण्यासाठी वेळ लागतो. सायंकाळी सात वाजता चंद्रकांत यांच्या खिशात असणाऱ्या लायसन्स व इतर कागदपत्रे आधारे कामशेत पोलीस ठाण्यात फोन आला व त्या वेळी त्याच्या बाबत परिवारास माहिती मिळाली.
जवळपास चार तास चंद्रकांत रस्त्यावर पडून होते. रात्री उशिरा नाशिक येथे पोहचत परिवाराने दुःखद अंतकरणाने व परिस्थितीत दुसऱ्या दिवशी चंद्रकांत यांचे नाशिक येथे पोस्टमार्टेम झाले त्यानंतर पार्थिव ताब्यात घेऊन कामशेत गाठले.
आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक मित्राच्या अंतिम यात्रेत पोहचण्यासाठी मी मात्र कामशेत येथील स्मशानभूमीत पोहचण्यास उशीर झाला. त्यांना अग्निडाग देत सर्व घरी परतली होती. स्मशानभूमीत कोणीही नव्हते… मात्र आमचा मित्र चंद्रकांत आज गरिबी, बिकट परिस्थिती, जगाच्या जालीम पसाऱ्यात चितेवर एकटाच जळत होता……!!!
व एकच मनात आले मृत्यूला गरिबी व कष्टाची कीव आली नाही का? भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा…
(  शब्दांकन- संदीप सोनार )

error: Content is protected !!