आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष
       डॉ.वर्षा रामदास पाठारे
प्रत्येक भूमिकेतील “ती” चा करा सन्मान
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.
या महिला दिनाच्या निमित्ताने मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. माझ्याविषयी सांगायचे झाले तर मी फार कोणी मोठी नाही. तुमच्यातलीच एक आहे. जीवनातील टप्प्यांना पार करत एक यशस्वी वैद्य बनण्याचा प्रवास करत आहे.
आकाशी झेप घे रे पाखरा।
सोडी सोन्याचा पिंजरा। ।
हे जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेले गीत मला नेहमी प्रेरणा देते. त्यामुळेच मी आज इथवर येऊन पोहोचले आहे.     माझ्याविषयी सांगायचे म्हटले तर मी अतिशय ग्रामीण भागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. पण हो मला कधीही आजवर वाटले नाही की, आपण मराठी शासकीय शाळेतून शिकलो म्हणून आपण कोणापेक्षा मागे आहोत. याचं कारण म्हणजे मला जे जे शिक्षक वृंद लाभले त्यांनी माझे व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचे योगदान दिले.
शाळेतील विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, शाळेतील परीक्षा, विज्ञान प्रदर्शन यामध्ये भाग घ्यावा यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा.तुला हे जमणार, तू हे करू शकते हे त्यांचे सकारात्मक बोल! त्यांनी माझ्या जीवनाला उत्कृष्ट असा आकार दिला.त्यामुळे मी शाळेत प्रथम क्रमांकावर असायचे.
स्पर्धांमध्ये ही अनेक पारितोषिके मिळवली.विज्ञान प्रदर्शनात ही सहभाग व उल्लेखनीय काम असायचे.इयत्ता आठवी मध्ये मला  एन्. एम्. एम्. एस्. शिष्यवृत्ती मिळाली होती. दहावी मध्ये मावळ तालुक्यातून पहिली आले. शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, आई-वडील आणि भावंडांचे प्रोत्साहन यामुळे हे शक्य झाले.
आपल्या मुलीमध्ये अभ्यासाचे कौशल्य आहे हे ओळखून आणि गांधी सरांच्या मार्गदर्शनामुळे पुण्यातील टॉप कॉलेज एस्. पी. कॉलेज येथे अकरावी बारावीचे शिक्षण उत्तम मार्काने पूर्ण करता करता डॉक्टर व्हायचे स्वप्न उरामध्ये बसले. त्यावेळी सीईटी ची तयारी केली व पुण्यातील डॉ.डी.वाय्.पाटील आयुर्वेद कॉलेज पिंपरी येथे बी.ए.एम्.एस्.साठी ऍडमिशन घेतले.
           बी.ए.एम्.एस्.करताना सुद्धा मी  2nd, 3rd आणि 4th इयर मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. द्वितीय वर्षामध्ये मी रसशास्त्र या विषयांमध्ये सुवर्णपदक मिळवले व महाराष्ट्रातून चौथा येण्याचा मान सुद्धा मिळवला. त्यावेळी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते MUHS नाशिक येथे सत्कार झाला.
           त्यानंतर मी एम्.डी.ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये सध्या रसशास्त्र या विषयांमध्ये एम्.डी.पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत आहे. पुढे जाऊन माझे आयुर्वेदाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा करण्याचे स्वप्न आहे. हा झाला माझा आतापर्यंतचा जीवन प्रवास यातून मला गावाकडील, आपल्या ग्रामीण भागातील महिला वर्गाला एकच सांगणे आहे की आपल्यामधील कौशल्य ओळखा व स्वतःला करिअरच्या दृष्टीने डेव्हलप करा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची धमक ठेवा.
           अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्यावर मात करून जीवनात काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगा. यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिवस हे फक्त एक प्रतिकात्मक उत्सव न राहून महिला सशक्तिकरणाच्या दिशेमध्ये बदलेल. जाता जाता मी एकच सांगेल की संत जनाबाईंनी आपल्या अभंगातून सांगितलेच आहे की,
स्त्री जन्म म्हणवूनि न व्हावे उदास| साधुसंता ऐसे केले जनी || संत जनाबाई .
पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा!!!
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरीडोंगर हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा!!

error: Content is protected !!