भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी
पिंपरी:
“अंतर्मनातील भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम आहे!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर प्रांगण, चिंचवडगाव येथ व्यक्त केले. कवयित्री मानसी चिटणीस लिखित ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त किशोर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे, शोभा जोशी, कवयित्री मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर; तसेच ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, नीलेश शेंबेकर, अभिजित काळे, हेमंत जोशी, स्मिता कुलकर्णी यांची सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “मानसी चिटणीस यांच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. काव्यातील अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या गुणांचे ओतप्रोत
दर्शन ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या कवितासंग्रहातून घडते. शांतीचा शोध घेताना कवयित्रीने प्रतिमा अन् प्रतीकांचा चपखल वापर केला आहे!” अरविंद दोडे यांनी, “सहस्त्र पाकळ्यांचे कमळ म्हणजे भगवान बुद्ध होय. माणसाला शांती, समाधान आणि सुख याची अभिलाषा असते; आणि प्रत्येकाच्या मनात एक बुद्ध दडलेला असतो. त्याचा शोध घेतल्यास माणसाची अपेक्षापूर्ती होते!” असे मत मांडले.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक आणि प्रकाशक नितीन हिरवे यांनी आपले शुभेच्छापर संदेश पाठविले होते. कवयित्री मानसी चिटणीस यांनी आपल्या मनोगतातून, “जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणात डोकावून पाहत नाही; तोपर्यंत आपल्यातील बुद्धाचा शोध लागत नाही!” अशी भावना व्यक्त केली.
कैलास भैरट, प्रदीप गांधलीकर, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र भागवत, उज्ज्वला केळकर, संगीता सलवाजी यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले. चिन्मय चिटणीस यांनी आभार मानले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस