सद्गुरु श्री वामनराव पै
जन्मशताब्दी – एका थोर निरपेक्ष समाजसुधारकाची
Ø  *जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वत:च्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो.*
Ø  *जगातील सर्व धर्मांचे सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करत असतात, पण प्रत्यक्षात मात्र ते जे काही करतात, त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्मही नसतो.*
Ø  *“माणसांनी माणसांबरोबर माणसासांरखे वागून एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे” हेच आहे देवाचे भजन-पूजन, तीच आहे देवाची भक्ती-उपासना आणि तोच आहे खरा धर्म.*
Ø  *“तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख-दुःख न चुकता तुमच्याकडे बुमरॅंग होऊन परत येईल.” हा निसर्गाचा अटळ नियम आहे.*
Ø  *दुसऱ्यांच्या सुखाने दुःखी होतो तो दानव, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो मानव व दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा.*
Ø  *स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.*
Ø  *ज्ञान हाच देव जो सर्व सुखाला कारणीभूत होतो तर अज्ञान हाच सैतान जो सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो.*
Ø  *ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल व सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे. ज्ञान हा देव, ईश्वर व परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानी व्हा व धन्य व्हा.*
Ø  *अर्थ प्राप्त करून देणारे, स्वार्थ साधणारे, अनर्थ निर्माण करणारे व परमार्थ सिद्ध करणारे असे हे मन हे जीवनाचे केंद्र असून ते मनच राम आहे किंवा रावण आहे, शंकर आहे किंवा भयंकर आहे, मोक्ष देणारे आहे किंवा कपाळ मोक्ष करणारे आहे.*
Ø  *विचार हा चैतन्य शक्तीचा अविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे.*
Ø  *माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे म्हणण्यापेक्षा ‘विचार करतो तो माणूस’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.*
Ø  *शरीर साक्षात परमेश्वर व सैतान सुद्धा.*
अशा अनेक क्रांतिकारी सिद्धांतांचे प्रणेते व “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असा दिव्य संदेश देणारे, थोर समाजसेवक, तत्वज्ञ व जीवनविद्येचे निर्माते सद्गुरु श्री वामनराव पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. २१ ऑक्टोबर १९२३ रोजी मुंबई गिरगावातील आंग्रेवाडीत सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्म झाला. १९४४ मध्ये मुंबई विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी विशेष गुणवत्तेने प्राप्त केली. त्यांनी प्रबोधने, कीर्तने, व्याख्याने, ग्रंथ लेखन अशा विविध माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. लालबाग, काळाचौकी, परळ अशा मुंबईतील गिरणगावात त्यांच्या कार्याची मुहूर्तमेढ झाली. त्यांनी निर्मिलेल्या जीवनविद्या या तत्त्वज्ञानाची व त्यांच्या कार्याची इथे थोडक्यात ओळख करून देत आहे.
*जीवनविद्या मिशन व उद्दिष्टे*
“अखिल मानव जात सुखी व्हावी” व “हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे” हे दोन उद्देश ठेवून सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. संतांची शिकवण, ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, त्यांच्या सद्गुरूंची त्यांच्यावर झालेली कृपा, त्यांचे स्वतःचे आत्मचिंतन आणि त्यांना जीवनात आलेले अनुभव यातून जीवनविद्या या तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली. जीवन सर्वांगाने व सर्वार्थाने सुखी करणारी विद्या असं जीवनविद्येचे वर्णन सद्गुरु करतात.
*अंधार अंधश्रद्धेचा, प्रकाश जीवनविद्येचा*
“परमेश्वर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करीत नाही” असे निक्षून सांगून त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले. त्याचवेळी  “माणूसच स्वत:च्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो” हे निसर्गनियमांद्वारे पटवून सांगितले. नशीब, दैव, भोग, भाग्य अशा प्रारब्धवादात अडकलेल्या लोकांना प्रयत्नवादाच्या मार्गावर आणले.
*निसर्गाचे नियम*
माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग असून माणसाचे जीवन हे निसर्गाच्या नियमांप्रमाणे आकार घेत असते हे त्यांनी पटवून सांगितले. “क्रिया तशी प्रतिक्रिया”, “कारणाशिवाय परिणाम नाही”, “जसे तुमचे विचार तसा जीवनाला आकार” अशा विविध निसर्ग नियमांच्याद्वारे, माणसाच्या स्वतःच्या कर्माप्रमाणे त्याचे जीवन घडत किंवा बिघडत असते, ही शिकवण त्यांनी अखिल मानव जातीस दिली.
*शरीराचे महत्त्व*
“शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा” हा सद्गुरु श्री वामनराव पै यांचा आणखी एक क्रांतिकारी सिद्धांत होय. सद्गुरु सांगतात “मानवी शरीर हे सुपर कॉम्प्युटर आहे.” आपण शरीररुपी कॉम्प्युटरला जसे योग्य-अयोग्य फीडिंग करू त्याप्रमाणे आपणाला रिझल्ट म्हणजे चांगले-वाईट जीवन प्राप्त होते. त्याचप्रमाणे “मानवी शरीर एक डिव्हाईन टेप रेकॉर्डिंग मशीन आहे.” आपण करत असलेली प्रत्येक क्रिया ही मनांतर्गत असणाऱ्या सूक्ष्मजाणीवेवर मुद्रीत म्हणजेच रेकॉर्ड होते व कालांतराने हीच रेकॉर्ड आपल्या जीवनात वाजू लागते म्हणजे आपण केलेल्या क्रियांप्रमाणे आपल्या जीवनात सुरेल अथवा बेसूर संगीत निर्माण होते.
*मानवी मन व विचारांचे सामर्थ्य*
बहिर्मन, अंतर्मन, अमन, शुद्ध मन व दिव्यमन असे मनाचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व व संबंध सद्गुरुंनी विशद करून सांगितले. मन (बहिर्मन) इंद्रियांच्याद्वारे जगाशी संबंध जोडते. मन इंद्रियांच्या ठिकाणी जागृत असेल तर त्या इंद्रियाच्या विषयाचा अनुभव येतो. उदाहरणार्थ रस्त्याने जात असताना जर आपण विचारात मग्न असू तर समोरून येणारा आपला मित्र आपल्याला दिसणार नाही. कारण डोळ्यातून पाहणारे मन त्यावेळी डोळ्यात हजर नसते. असे मनाचे महत्त्व अपरंपार असून, सद्गुरु सांगतात मन आहे तर जीवन आहे. हेच मन  (दिव्यमन) पलीकडील बाजूने सर्व शक्तिमान अशा विराट चैतन्य शक्तीशी जोडलेले असते. मनाचे महत्त्व सर्व संतांनी वर्णिले आहे.
Out of sight is out of mind. अशी इंग्रजीत एक म्हण आहे. याचा अर्थ जे नजरेत येत नाही ते मनाच्या कक्षेत येत नाही. सद्गुरु सांगतात मन डोळ्यांनी पाहता येत नाही, म्हणून मन मनाच्या कक्षेत येत नाही. “माझ्या मनात नाही” या वाक्याच्या पलीकडे आपण मनाचा कधीच विचार करत नाही. मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या या मनाला पाहायचं कसं? याचे उत्तर सद्गुरु श्री वामनराव पै देतात.
सद्गुरू सांगतात मनात येणारे विचार हे मनाचे व्यक्तरूप होय. मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवून, त्यांना आवर घालून, वाकवून व योग्य दिशेने वळवून मनाला सुदृढ कसे करावे हे सद्गुरु शिकवितात. सद्गुरु सांगतात विचार हा विश्वाचा सम्राट आहे कारण विचारांतूनच सर्व गोष्टींची निर्मिती होत असते. प्रत्येक गोष्ट विचारांच्या माध्यमातून प्रथम मनात जन्म घेते व नंतर विश्वात प्रत्यक्ष आकाराला येते. विचाराकडून आकाराकडे सरकणे हा मनाचा स्थायीभाव आहे. म्हणून मनात जसे विचार येतात त्याप्रमाणे जीवनाला आकार मिळतो. मनामध्ये आपण चांगले विचार घोळवू शकलो तर आपल्या जीवनाला चांगला आकार मिळतो. मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी त्यांनी विश्वप्रार्थनेची निर्मिती केली. विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची खाण आहे. या विश्वप्रार्थनेमध्ये ईश्वर स्मरण आहे तसेच शुभ स्मरण देखील आहे.
*विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना*                                                                        .हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
   सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
  सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
*परमेश्वर खरंच आहे का?*
हा प्रश्न जगाच्या सुरुवातीपासून विचारला जातो व कायम विचारला जाईल. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक  परमेश्वर आहे असे मानणारे, ज्यांना आपण आस्तिक म्हणतो व दुसरे परमेश्वर नाही असे मानणारे, ज्यांना आपण नास्तिक म्हणतो. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात आस्तिक व नास्तिक दोघेही मानण्याचं काम करतात. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या स्त्रीला आपण आपली बहीण मानतो, असे सांगतो, तेव्हा आपण आपल्या तोंडाने ती आपली बहीण नाही हे जाहीर करीत असतो. त्याप्रमाणेच आस्तिक व नास्तिक दोघेही मानत असतात; पण आस्तिक व नास्तिक दोघेही परमेश्वर जसा समजतात तसा परमेश्वर प्रत्यक्षात नाही.
सद्गुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची विज्ञाननिष्ठ व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. BARC मधील शास्त्रज्ञांनी ही व्याख्या, परमेश्वराची most scientific व्याख्या असल्याचे म्हटले आहे.
*सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या कार्याचे स्वरूप*
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी साधारण १९५० च्या सुमारास समाज प्रबोधनाच्या कार्यास सुरुवात केली. आपली नोकरी सांभाळून, त्याकाळानुसार प्रवचने व कीर्तने यांच्या माध्यमातून कार्य सुरू केले. सुरवातीला गिरगावात व नंतर काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने होऊ लागली. मध्यंतरी साधारण एक वर्ष त्यांची पुण्याला बदली झाली. तेव्हा ऑफिस सुटल्यावर ते पुण्याहून मुंबईला येत. रात्री ९ ते १० प्रवचन करत व सकाळी लवकर उठून ऑफिससाठी पुण्याला जात. नाथ संप्रदायाच्या परंपरेतून आलेली साधना ते सत्साधकांस शिकवत. त्यावेळी नामस्मरणावर त्यांचा भर असे. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थेचे नाव नाम संप्रदाय मंडळ असे ठेवले होते. नाम स्मरणाचं महत्त्व व उपयोग सांगणारा नामाचा नंदादीप हा ग्रंथ त्यांनी १९६२ साली लिहिला. त्यानंतर पुढील वर्षी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा शब्दार्थ, भावार्थ व गुह्यार्थ उघड करणारा ज्ञानेशांचा संदेश हा ग्रंथ संपन्न केला. हाकारुनी सांगे तुका | नाम घेता राहू नका || या कळवळ्याने सद्गुरु, नामाचे व नामस्मरणाचे महत्त्व सांगत राहिले.
सर्व संतांना जसा अनुभव आला की आपण इतके पोटतिडकीने देवाचे नाम घ्यायला सांगतो पण लोक काही हवं तसं नामस्मरण करीत नाही, तसाच अनुभव सद्गुरुंनाही आला. सद्गुरुंनी यावर चिंतन केले, समाज मनाचा अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की लोक पोटापाण्याच्या विवंचनेत इतकी अडकली आहेत की त्यांना देव व देवाचं शुद्ध नांव या कशासाठी वेळ मिळत नाही. लोकांच्या नेहमीच्या चिंता मिटेनाशा झाल्या की लोक अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या आहारी जातात. हे सर्व लोकांच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळे होते आहे, हे पण त्यांच्या लक्षात आले. लोकांचा संसार सुखाचा झाल्याशिवाय व प्रपंच नीट झाल्याशिवाय त्यांना खऱ्या देवाची व त्याच्या नामाची गोडी लागणार नाही हे त्यांनी ओळखले. सद्गुरु सांगतात पोटाची चिंता ज्याला, परमार्थ नाही त्याला. मग त्यांनी सामान्य लोकांच नेहमीचं जीवन सुखी कसं होईल यासाठी सखोल चिंतन करून  जीवनविद्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. सद्गुरु सांगतात संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. तदनंतर जीवनविद्येची शिकवण उलगडून सांगणारा ग्रंथ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार लिहिला. काही दिवसांनी मनाचं महत्त्व व शास्त्र समजून सांगण्यासाठी अमृत मंथन हा ग्रंथ प्रगट केला. असाध्य ते साध्य| करीता सायास| कारण अभ्यास| तुका म्हणे|| या उक्तीप्रमाणे लोकांमध्ये अभ्यास व सायास म्हणजेच प्रयत्न करण्याची सवय रुजावी यासाठी प्रयत्न सुरू केले. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा व देवासकट सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नांत आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय, अशी शिकवण दिली. सद्गुरुंनी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे या ग्रंथातून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या विविध पद्धती शिकवल्या. पुढे सद्गुरुंनी जीवनविद्या तत्वज्ञान विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे आकाशवाणी मुंबई केंद्र व दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सलग अनेक वर्षे व्याख्याने दिली. स्वतः समाज प्रबोधन सतत करत असतानाच आपल्या शिष्यांना देखील या कार्यात सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांचे शिष्य म्हणजे नामधारक गावागावांतून घरोघरी संपर्क अभियानाद्वारे जीवनविद्येची माहिती पोहचवितात, शाळा कॉलेजातून मार्गदर्शन करतात, सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू समारंभ, साहित्य संमेलने, गावागातील जत्रा, यात्रा, आठवडी बाजार, रेल्वे स्थानक, एसटी स्टॅण्ड अशा गर्दीच्या ठिकाणी ग्रंथदिंडी आयोजन व आता कॉर्पोरेट जगतात कॉन्फरन्स अशा विविध माध्यमातून सद्गुरुंच्या ग्रंथांचा प्रचार व जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आपला कामधंदा सांभाळून व एक पैशाचाही मोबदला न घेता करतात. आज सद्गुरुंच्या देहावसनानंतर देखील हे कार्य अखंडपणे चालू आहे. यामध्ये हजारो नामधारक, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील हजारो गावांतील लाखो लोकांपर्यंत पोहचलेत व अजूनही जात आहेत.
*सद्गुरु श्री वामनराव पै व जीवनविद्या यांचे वेगळेपण*
मानसशास्त्र, परामानसशास्त्र व अध्यात्म शास्त्र असा त्रिवेणी संगम जीवनविद्या तत्त्वज्ञानामध्ये आढळतो. जीवन जगताना सावध राहून मनाला चांगलं वळण लावून प्रयत्नांच्याद्वारे आधिभौतिक उत्कर्ष कसा साधायचा याचं गुपित सद्गुरुंनी सामान्य जनांच्या हाती दिले. त्याचबरोबर खऱ्या सत् साधकांना खऱ्या परमार्थात प्रगती करण्यासाठी व आत्मसाक्षात्कारापर्यंत वाटचाल करण्यासाठी कोणत्याही कर्मकांडाविरहित दिव्य बोध व दिव्य साधना सद्गुरु देत असत. सद्गुरु सांगतात खऱ्या परमार्थाची सुरुवात देवाच्या दर्शनाने होते व त्याची सांगता स्वये देव होण्याने होते.
जीवनविद्ये मध्ये कर्मकांड नाही तर कर्मचांग म्हणजे चांगलं कर्म करणं आहे. सद्गुरु सांगतात विचार, उच्चार व आचार या तीन पातळीवर माणूस कर्म करत असतो. माणूस विचार करतो, उच्चार करतो आणि प्रत्यक्ष आचार करतो. हे तीनही करणं हे माणसाचे कर्मच असते. यातील विचार करण्याला अत्यंत महत्त्व आहे, कारण उच्चार व आचार दोन्हीही विचारांतूनच निर्माण होतात. जगातील सध्याच्या सगळ्या प्रदूषणांना विचार प्रदूषण कारणीभूत आहे. म्हणून सद्गुरु सांगतात विचार बदला, नशीब बदलेल.
जीवनविद्या जशी आगळी आणि वेगळी आहे तसेच सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जीवन पण आगळं आणि वेगळं आहे. अध्यात्मातील, परमार्थातील किंवा धार्मिक क्षेत्रातील इतर बहुतेक गुरु स्वतः कोणताही काम धंदा करीत नाही. परंतु सद्गुरु श्री वामनराव पै हे याबाबतीतही वेगळे आहेत. ते सांगत उद्योग हाच सर्वात मोठा योग होय.
सद्गुरु श्री वामनराव पै स्वतः महाराष्ट्र शासनामध्ये सेवा देऊन १९८१ साली डेप्युटी सेक्रेटरी फायनान्स या पदावरून निवृत्त झाले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असताना व नंतरही वयाच्या २४ व्या वर्षापासून ८९ व्या वर्षापर्यंत सलग ६५ वर्षे अव्यहातपणे त्यांनी समाज प्रबोधनाचे, समाज सुधारण्याचे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ६५ वर्षाच्या या समाज प्रबोधनाच्या कार्यात दहा हजारांहून अधिक प्रबोधने, प्रवचने व कीर्तने केली. पण त्यांनी कधीही प्रबोधनाची, प्रवचनाची, कीर्तनाची एक रुपयाचीही बिदागी घेतली नाही. त्यांनी २९ ग्रंथांची मराठी भाषेत निर्मिती केली. या ग्रंथांचे हिंदी, गुजराती, कानडी, इंग्रजी व आता फ्रेंच अशा विविध भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. या सर्व ग्रंथांच्या आतापर्यंत लाखोंनी प्रती विक्री झालेल्या आहेत. पण त्यांनी या ग्रंथांच्या विक्रीतून एक रुपयाची रॉयल्टी घेतलेली नाही. प्रत्येक प्रतीमागे एक रुपया जरी घेतला असता तरी कोट्यावधी रुपये मिळाले असते. जीवनविद्या फाउंडेशन या ट्रस्टच्या माध्यमातून या ग्रंथांची छपाई केली जाते व छपाई खर्च निघेल इतक्या अल्प किमतीत या ग्रंथांची विक्री केली जाते व ग्रंथ विक्रीतून आलेली रक्कम पुनश्च ग्रंथ छपाईसाठी वापरली जाते.
*सद्गुरु श्री वामनराव पै व त्यांचे कुटुंबीय*
“संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ” अशी शिकवण त्यांनी परमार्थाच्या नावाखाली भरकटलेल्यांना दिली. परमार्थाच्या नावाखाली संसार त्याग करणे, बायका मुलांना वाऱ्यावर सोडणे, कामधंदा सोडणे, जंगलात, गुहेत किंवा हिमालयात जाऊन राहणे अशा गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनात उत्तम संसार करीत परमार्थ कसा साधायचा याचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलं. ऑफिसमधून घरी आल्यावर संध्याकाळनंतर त्यांनी समाज कार्याला वाहून घेतलं होतं; पण आठवड्यातून एक दिवस ते कुटुंबाला देत असत. घरच्या संसाराची जबाबदारी त्यांच्या पत्नी सौ शारदामाई यांनी समर्थपणे पेलली. त्यांचा मुलगा श्री प्रल्हाद पै हे आय.आय.टी. मुंबईतून बी. टेक. असून मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत. सध्या श्री प्रल्हाद पै हे जीवनविद्या मिशनचे कार्य सांभाळत आहेत. श्री प्रल्हाद पै यांनी जीवनविद्येवरील विविध कोर्सेसची निर्मिती केली आहे.
*जीवनविद्या मिशन व जीवनविद्या विश्व ज्ञानपीठ*
जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी जीवनविद्या मिशन ही संस्था निर्माण केली. त्याचप्रमाणे जीवन विद्या तत्वज्ञानाचा अभ्यास लोकांना अखंडपणे व कायमस्वरूपी करता यावा यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील निसर्गरम्य परिसरात जीवनविद्या विश्व ज्ञानपिठाची निर्मिती केली. या विद्यापीठात जीवनविद्या कोर्सेससाठी दोन ट्रेनिंग सभागृह, ध्यान धारणेसाठी विश्वप्रार्थना केंद्र, ॲंफीथिएटर, दीडशे लोकांना राहण्यासाठी रूम्स, किचन व डायनिंग हॉलची व्यवस्था आहे. इथे दोन-तीन दिवसांचे  जीवनविद्येवरील रेसिडेन्शिअल कोर्सेस नियमित होत असतात.
*समाजाने घेतलेली दखल*
देह ठेवेपर्यंत, सलग ६५ वर्षे अविरतपणे सद्गुरु श्री वामनराव पै यांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याची व त्यामुळे समाजात झालेल्या परिवर्तनाची समाजाने सढळ हस्ते पोच पावती दिली तसेच मुक्तकंठाने प्रशंसाही केली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे, सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिका, तळेगाव दाभाडे, कराड, इंदापूर, वेंगुर्ला या नगरपरिषदा यांनी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव केला. ज्ञानेश्वर विद्यापीठ पुणे, रोटरी क्लब अहमदनगर, श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ वारजे, श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्ट शिरूर, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली, श्रमिक मुक्त पत्रकार संघ, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन, पु. भा. भावे स्मृती प्रतिष्ठान यांच्याकडूनही सद्गुरु कार्य गौरविण्यात आले.
सद्गुरूंच्या देहावसनानंतर जीवनविद्या मिशनचे कार्य त्यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद पै समर्थपणे सांभाळत असून त्यांना लोकमत समुहा तर्फे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
*जन्मशताब्दी*
२१ ऑक्टोबर १९२३, बलिप्रतिपदा या दिवशी सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्म झाला व त्यांचे देहावसन २९ मे २०१२ रोजी झाले. चालू वर्ष हे सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे घोषवाक्य आहे “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.” जीवनविद्या मिशन तर्फे या जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील घरोघरी विश्वप्रार्थना हा मुख्य उपक्रम आहे. सक्षम सामूहिक अंतर्मनाच्या उभारणीसाठी घरोघरी विश्वप्रार्थना हा शुभ विचारांची पेरणी करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

✳️✳️✳️✳️✳️

error: Content is protected !!