एक लाख नोकऱ्या देणारा जांभूळगावाचा प्रतिक गाडे
वडगाव मावळ : तरुण दहावी शिकलेला असो की इंजिनीअरिंग झालेला, प्रतिक गाडे या युवकाकडे तो नोकरीसाठी आला की रिकाम्या हाताने परत जात नाही. गेल्या आठ वर्षांपासून आपला व्यवसाय सांभाळून प्रतिकने बेरोजगारी कमी करण्याचा ध्यास घेतला अन् आतापर्यंत त्याने एक लाखपेक्षा अधिक तरुणांना नोकरी लावली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या प्रतिकने या तरुणांकडून आजतागायत एका रुपयाचेही कमिशन घेतलेले नाही.
पाचशे कंपन्यांबरोबर ‘टायअप’ करून त्याने समाजातील अनेक तरुणांचे करिअर घडवण्यासाठी हातभार लावला आहे.
रोजगार देतानाच प्रतिकने बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक गरजेप्रमाणे व्यावसायिक प्रशिक्षण द्यायलाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या कौशल्य प्रशिक्षणाचेही तो पैसे आकारत नाही.
‘सेल्स’, ‘मार्केटिंग’ आणि ‘आयटी’ या तीन क्षेत्रांमध्ये त्याने आतापर्यंत सर्वाधिक तरुणांना नोकऱ्या लावल्या आहेत. यासाठी पुणे आणि परिसरातील पाचशेपेक्षा अधिक कंपन्यांशी ‘टायअप’ करून, त्या कंपन्यांना मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी प्रतिकने स्वीकारली आहे. नोकरी लावून देण्यासाठी बाजारात अनेक खासगी संस्था कार्यरत आहेत. या संस्था तरुणांना नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पगारातून काही विशिष्ट रक्कम आकारतात.
पण तसे न करता प्रतिकने गेल्या आठ वर्षांपासून तरुणांकडून कोणतेही शुल्क आकारलेले नाही. चार वर्षांपूर्वी त्याने ‘परफेक्ट स्किल्स’ ही कंपनी स्थापन केली असून, त्यामार्फत तो व्यवसाय आणि सामाजिक काम, अशा दोन्ही पातळ्यांवर उत्तम कामगिरी करीत आहे.
प्रतिकने कंपन्यांसाठी ‘हायरिंग इव्हॅल्युएशन’ करणारे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून कंपन्यांना नेमकी कोणती कौशल्ये अवगत असलेले तरुण नोकरीसाठी हवे आहेत, याची माहिती मिळते. त्यानुसार कंपन्या अनेक ‘प्लेसमेंट एजन्सी’कडे त्यांची आवश्यकता दाखल करतात. प्रतिकला या सॉफ्टवेअरच्या सेवेतून अर्थिक मोबदला होतो.
त्याच माहितीच्या आधारे तो बेरोजगार तरुणांना विशिष्ट कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण देतो. यामुळे हजारो तरुणांचा करिअरचा प्रवास सुरू झाला आहे.प्रतिक गाडे याची गेल्या आठ वर्षांतील रोजगार क्षेत्रातील ही कामगिरी पाहून राज्य सरकारलाही त्याची भुरळ पडलेली आहे. राज्य सरकारही त्याच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असून, लवकरच एका व्यासपीठाद्वारे राज्य सरकार खासगी नोकऱ्यांसाठी प्रतिकच्या मदतीने एक प्रकल्प उभारणार आहेत.
याद्वारे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील, असा विश्वास प्रतिकने व्यक्त केला आहे. ‘परफेक्ट स्किल्स’चे संचालक प्रतिक गाडे म्हणाले,माझा व्यवसाय रोजगार क्षेत्राशी संबंधित असल्याने आपणच सॉफ्टवेअरद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे तरुणांची मदत का करू नये, असा प्रश्न पडला आणि त्याचे उत्तर म्हणून हा उपक्रम सुरू केला.
अगदी दहावी शिकलेल्या तरूणापासून ते इंजिनिअरींग करणाऱ्या प्रत्येकाला एकही रूपया न खर्च करता नोकरी लागायला हवी, असा ध्यास आम्ही ठेवला.आणि तो ध्यास मार्गी लागतोय याचे समाधान आहे.
प्रतिकच्या या सामाजिक बांधिलकीचा त्याचे वडील
सुभेदार मेजर मारुती विठ्ठलराव गाडे,चुलते मावळ तालुका दिंडी समाजाचे कार्याध्यक्ष तुकाराम गाडे, माजी उपसरपंच व. सदस्य एकनाथ गाडे अभिमान आहे.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम