योगीराज पतसंस्था सामाजिक व आर्थिक कार्यात अग्रेसर: माजी खासदार छत्रपती संभाजीराजे
बाळासाहेब काशीद  योगिराज भूषण पुरस्काराने सन्मानित
पिंपरी:
          योगीराज पतसंस्था  सामाजिक कार्या बरोबरच आर्थिक क्षेत्रातही अग्रेस असल्याचे  प्रतिपादन माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी केले. योगीराज पतसंस्थेच्या वतीने भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद योगाथयांना ‘योगीराज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
           योगीराज पतसंस्थेच्या वतीने यावर्षीचा ‘योगीराज भूषण पुरस्कार’ भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना खासदार छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच भंडारा डोंगर येथे होणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्यासाठी पतसंस्थेच्या वतीने ५  लाख व उपस्थितांच्या वतीने असे एकूण १ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली.
           महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल वसुंधरा अभियान, माऊंट मेरू शिखर मोहीम सर करणारे गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्था यांचा प्रत्येकी 51 हजार निधी देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल श्रीराम समर्थ पतसंस्था व बाणेर नागरी पतसंस्था यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                                     ‘मला जो आज हा आपण योगीराज भूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे तो या मंदिर निर्माणच्या कार्यासाठी कार्यरत असणारे माझे सर्व ट्रस्टचे सहकारी तसेच मराठवाडा, विदर्भ अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून जो भाविक श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येतो .
           व परतीच्या प्रवासाच्या शिल्लकीचा विचार न करता आपल्या जवळील ५० रुपये या मंदिराला देणगी देतो त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे’ असे विनम्रपणे हभप बाळासाहेब काशीद यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबारायांचे आकाशा एवढ्या उंचीचे असणारे कार्य व परम पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे स्थान महात्म्य यामुळे या मंदिर निर्माणाच्या कार्याला देणगी  प्राप्त होत आहेत.
           बाळासाहेब काशीद अथवा ट्रस्टच्या कोणा सदस्यामुळे हे देणगी प्राप्त होत नाही. त्यामुळे माझ्यासह कोणीही तसा अहंकार बाळगू नये असे परखडपणे सांगत काशिद यांनी मिळालेल्या पुरस्काराची १ लाखाची रक्कम मंदिर निर्माण  कार्यासाठी दिली. उद्योजक असणारे हभप गजानन (बापू) शेलार यांनी आम्हा सर्व सहकाऱ्यांना व डोंगरावर श्रद्धा असणाऱ्या अनेक भाविकांना गुजरात, राजस्थान ते दिल्ली पर्यंत स्वखर्चाने नेत जवळजवळ ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च करीत या भागातील अनेक चांगली सुवर्ण तांबूस दगडातील मंदिरे दाखवली व अशाच पद्धतीने डोंगरावर देखील मंदिर झाले पाहिजे व त्यासाठी नामवंत स्थापत्य विशारद सोमपुरा बंधू यांची निवड केली असे काशिद महाराजांनी पुढे सांगितले.
         संभाजी राजे यांनी सांगितले की ,” महाराष्ट्र हे सहकाराचे राज्य म्हणून संबोधले जाते, ते फक्त संबोधनापुरतेच उरले आहे. परंतु सहकार क्षेत्रामध्ये योगीराज नागरी पतसंस्थेने या कठीण काळात सुद्धा आपले वेगळेपण व नाविन्य पण दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या विविध संतांचे राजांचे सुसंस्कार आपल्यावर आहेत. यामुळे महाराष्ट्राचे वेगळेपण आज आपल्याला पहावयास मिळते आहे. तसेच राजेंनी गडकोट किल्ल्यांसाठी प्रश्न उपस्थित केला.
         आपण उपस्थित आमदार काय करणार आहोत? असे त्यांनी यावेळी विचारले. साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गडकोट किल्ल्यांसाठी साडेतीनशे कोटी जाहीर केले. परंतु जून पासून अद्याप पर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याची आता आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे असेही यावेळी नमुद केले.
         पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगीराज पतसंस्था ही उत्कृष्ट कार्य करत आहे याची इतर संस्थानी दखल घेऊन कार्य करावे असे यावेळी सांगितले.
       यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, संस्थेने आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे अशीच प्रगती यापुढेही कायम राहील अशी आशा व्यक्त केली. भंडारा डोंगरा साठी केंद्रातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले.
         संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. तसेच सभासदांना यावर्षी 13% लाभांश जाहीर केला. पतसंस्थेच्या माध्यमातून भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी आज जरी 1 कोटी रुपयांची देणगी दिली असली तरी मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत देणगी देण्याचे काम चालू राहील असेही यावेळी सांगितले.
         याप्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील शेळके, मा. आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक विकास दांगट, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तममहाराज मोरे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, उपनिबंधक निलम पिंगळे, उद्योजक विजय जगताप, गजानन (बापू) शेलार, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, धर्मवीर संभाजी बँकेचे अध्यक्ष बाबूराव शितोळे, इस्कॉनचे प्रभूजी, पुरंदर पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव, अशोक मुरकुटे, भगवान पठारे, चांगदेव पिंगळे, बाळासाहेब बराटे तसेच भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त, हवेली, मावळ, मुळशी, खेड  तालुक्यातील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी   आभार मानले.

error: Content is protected !!