वडगाव मावळ:
निसर्ग वेड्या हौशी पर्यटकांचा निसर्गातच अंत झाला. त्याचे बालपण सुख समाधान आणि आनंदात गेले. सत्तरच्या दशकात तो इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेणारा आंदर मावळातील पहिला विद्यार्थी. शहराशी त्याचे नात जुळलं नाही. तो रमला तो आंदर मावळाच्या द-या खौ-यात,हिरवीगार वनराई,धोधो फेसाळत वाहणारे धबधबे त्याला जीवप्राण. याच निसर्गाच्या रौद्र रूपात त्याने देह सोडला.
नागाथलीचा चंद्रशेखर नथुराम खांडभोर (वय ५६)असे या निसर्गवेडया पर्यटकाचे नाव. चंद्रशेखर खांडभोर शुक्रवार ता.२२ सप्टेंबरला कळकराईला गेला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. शुक्रवार ता.२२ ते सोमवार ता.२५ या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वडगाव पोलीसांनी दिली. या बाबतची हकीकत अशी,
द्रोपदी गिरीष रिंगे,वय- ६१  वर्षे, व्यवसाय- गृहिणी रा.आंबेवाडी कान्हे ता.मावळ यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे त्यांचा भाऊ चंद्रशेखर नथुराम खांडभोर वय ५६ वर्षे, रा.नागाथली ता.मावळ जि.पुणे हा हरवले तक्रार दिली होती.
सोमवारी सायंकाळी ४ वा. सुमारास सावळा गावचे पोलीस पाटील यांचेकडून रिंगे यांना  समजले की, त्यांचा भाऊ चंद्रशेखर खांडभोर हा कळकराई येथील दरीत दगडामध्ये मयत अवस्थेत दिसला. त्यानंतर रिंगे आणि त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ व पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
तर सदरचा मयत इसम चंद्रशेखर नथुराम खांडभोर हा असल्याची ओळख पटली. चंद्रशेखरला ट्रेकिंग व झ-यात अंघोळ करण्याची आवड होती. व त्याला कोणाचाही नाद नव्हता. त्याच्या डोक्यात डोगरावरून दरड कोसळून पडलेल्या दगडाचा चंद्रशेखर यांच्या  डोक्याला लागुन जखम झालेल्याचे दिसले.
झ-यातील व पावसाचे पाण्याने व प्रवाहाने चंद्रशेखर यांच्या अंगावरील कपडे वाहून गेल्याचे दिसले. सदर मयताबाबत माझा कोणावर संशय अगर वहिम नाही,असे चंद्रशेखर यांच्या भगिनी द्रौपदी यांनी फिर्यादीत म्हटले असल्याचे पोलीसांनी सांगितले.
चंद्रशेखर यांचे वडील नथुराम खांडभोर मावळ तालुक्यातील थोर किर्तनकार होते. तसेच ते डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यांचा अध्यात्मिक व्यासंग दांडगा होता. ज्या काळात मुले जीवन शिक्षण मंदिरात शिक्षण घ्यायला येत असायची त्या काळात चंद्रशेखर यांना पुणे निगडी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण त्यांनी दिले. मात्र त्यांचे मन शहरा पेक्षा गावाकडे अधिक रमले. इलेक्ट्रिशियन,मोटार दुरूस्तींची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. बाईक रायडर ही त्यांची ओळख होती. तीव्र उतार, चढण आणि डोंगरावर ते एम .८० सारखी दुचाकी घेऊन जायचे. आंदर मावळातील गावागावात त्यांचा दृढ स्नेह होता. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!