पाप-पुण्य समज गैरसमज
“पुण्याईची कमाई”
मानवी दृष्य बँकेप्रमाणे दुसरी एक अति महत्त्वाची बँक आहे व त्या बँकेला दिव्य अदृश्य बँक (Divine Bank) असे म्हणतात.अशा तऱ्हेची दिव्य बँक अस्तित्वात आहे ह्याची काहीच जाणीव लोकांना नसते,मग ते अशिक्षित असोत किंवा सुशिक्षित असोत.इतकेच नव्हे तर विद्वान व विज्ञाननिष्ठ लोकांना सुद्धां ह्या दिव्य बँकेचे ज्ञान नसते.
हे ‘अज्ञान’ हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका आहे.पैशासाठी,सत्तेसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माणसे वाटेल तशी वागतात किंवा वाटेल ते करतात.ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या दिव्य बँकेसंबंधी त्यांचे असणारे प्रचंड अज्ञान हे होय.ही दिव्य बँक अतिशय विलक्षण असून तिचे अस्तित्व प्रत्येक माणसाच्या हृदयात म्हणजे सूक्ष्म खोल जाणिवेत असते.
प्रत्येक माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्यांचे सूक्ष्म ठसे त्याच्या अंतःकरणात उमटतात व ते पाप किंवा पुण्य ह्या स्वरुपात दिव्य बँकेत जमा होतात.मानवी बँकेचे व्यवहार बहिर्मन जाणीवपूर्वक करते तर ह्या दिव्य बँकेचे व्यवहार अंतर्मन नेणीवपूर्वक ( intuitively ) करीत असते. मानवी बँकेत पैसे जमा करण्याचे किंवा त्या बँकेतून पैसे काढण्याचे काम आपले बहिर्मन करते.
त्याचप्रमाणे दिव्य बँकेत पाप-पुण्य जमा करण्याचे व त्यांचा विनियोग करण्याचे कार्य अंतर्मन करीत असते.माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्यांची प्रतिक्रिया निसर्गाच्या नियमानुसार आज ना उद्या घडणार हे निश्चित.ही प्रतिक्रिया सुख किंवा दुःख ह्या स्वरुपात माणसाच्या अनुभवाला येते.सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच असे मात्र नाही.निरनिराळ्या जातीची झाडे वेगवेगळ्या कालांतराने माणसाला फळे देत असतात.कांही झाडे दोन वर्षांनी किंवा पंधरा वर्षांनी फळे देतात, तर अक्रोडाचे झाड दीडशे वर्षांनी सुद्धां फळ देते.
अगदी त्याचप्रमाणे माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करीत असतो ती कर्मे निरनिराळ्या जातींची असून वेगवेगळ्या कालांतराने माणसाच्या जीवनात सुख-दुःखाच्या रुपाने फळास येतात.हा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल,ती ही की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो ती प्रत्यक्षात सुख-दुःख रुपाने अनुभवास येण्यापूर्वी ती त्याच्या खोल जाणीवेत अव्यक्त स्वरुपात वास करून राहतात.
ह्याचाच अर्थ असा की,माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो ती प्रत्यक्षात फळाला येण्यापूर्वी त्याच्या खोल जाणीवेत पाप-पुण्य ह्या स्वरुपात वास करून राहतात व जीवनात सुख-दुःख रुपाने प्रत्यक्षात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पहात राहतात.जेव्हां अनुकूल परिस्थिती निर्माण होते,तेव्हां खोल जाणीवेत वास करून राहिलेली ही पाप-पुण्ये प्रत्यक्षात साकार होऊन त्या माणसाला सुख-दुःखाचे भोग भोगायला लावतात.
सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन