नामस्मरण व इतर साधने या मध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. ईश्वरप्राप्तीचे कुठलेही साधन त्या त्या काळातील परिस्थितीला अनुसरून असले पाहिजे, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टीकोन आहे.
आजचा काळ जर आपण लक्षात घेतला तर असे दिसून येईल की, केवळ पोट भरण्यासाठी माणसाला प्रचंड प्रमाणावर वेळ खर्च करावा लागून अपरिमित कष्ट व मेहनत करावी लागते. जीवन जगण्यासाठी माणसाची ही चाललेली धडपड (Struggle for existence) लक्षात घेतली तर नामस्मरणाव्यतिरिक्त असलेली सर्व साधने प्रस्तुत काळाला अनुसरून नाहीत असे दिसून येईल.
उदाहरणार्थ, यथासांग पूजा करण्यासाठी अनेक उपकरणे गोळा करावी लागतात व नाना उपचार करावे लागतात. ग्रंथ पारायणाचा तोच प्रकार आहे. पारायण करण्यासाठी ग्रंथ पाहिजे, प्रकाश पाहिजे, वेळ पाहिजे, जागा पाहिजे, भाषेचे ज्ञान पाहिजे, अनुकूल परिस्थिती पाहिजे, शरीर धडधाकट पाहिजे.
एवढ्या सर्व उपाधी सांभाळल्या गेल्या तरच पारायण ही साधना जमू शकते. शिवाय हे पारायण करीत असताना ग्रंथातील सांगितलेल्या बोधावर लक्ष नसेल तर पारायणाचा खरा उद्देश सफल होत नाही. तीर्थयात्रेबद्दल तर बोलणेच नको. सध्याच्या भयंकर प्रतिकूल अवस्थेत तीर्थयात्रा करणे सर्व दृष्टीनेच गैरसोयीचे आहे .
उदा. वेळ, पैसा, शरीराची साथ, प्रवासाची साधणे, तसेच इतर व्यवस्था. परंतु नामस्मरण या साधनेचा प्रकार मात्र वेगळा व आगळा असा आहे. कुठल्याही युगाला, काळाला, परिस्थितीला नामस्मरण हे अनुरूप साधन आहे. नामस्मरणाला कसलेही बंधन नाही, सोवळे-ओवळे नाही, स्थळ काळाच्या मर्यादा नाहीत, भाषेचा प्रश्न नाही, परिस्थितीचा प्रश्न नाही, वर्णजातीचा प्रश्न नाही, खर्च नाही, कष्ट नाही.
अशा तऱ्हेने नामस्मरणाला कसलीही उपाधी नाही व कसलीच अडचण नाही. नामस्मरण हे स्वतंत्र असून या साधनेत फक्त तीन गोष्टी लागतात. त्या म्हणजे जीभ, मन व नाम या असून या तिन्ही गोष्टी आपल्या जवळच सदैव हजर असतात. नामस्मरण हे स्वतंत्र साधन असून ते साधन साधकाला स्वतंत्र करते म्हणजे जीवनमुक्त करते. सध्याच्या धकाधकीच्या बिकट परिस्थितीत सुद्धा नामस्मरण हे साधन सर्वांना करता येणे शक्य आहे.
आज अशी परिस्थिती आहे की, माणूस सकाळी जो बाहेर पडतो तो रात्री दमून भागून घरी परत येतो. अशा परिस्थितीत नामस्मरण हे एकच साधन तो करू शकतो. नामस्मरण जर मनापासून केले तर माणसाला आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे फायदे मिळू शकतात. वरील विवेचनावरून नामस्मरणावर विशेष भर द्यायला हवे ते कळून चुकेल.
सद्गुरू श्री वामनराव पै.
- महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करतील – सुनील शेळके
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज
- संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले: खासदार बृज लालजीपिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
- बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन