पुणे:
अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकार तर्फे दिला जाणारा पद्मश्री पुरस्कारअशोक सराफ यांना द्यावी ही विनंती करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अशोक सराफ यांचे कौतुक करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “अशोक’चा अर्थ म्हणजे दुःखाला दुर ठेवणे आहे. सहजपणे अभिनय करणे हा त्यांचा गुण. मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. कर्तृत्व आणि नम्रपणा म्हणजे अशोक सराफ. त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले.

त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची आहे.”

अभिनयामध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि प्रेक्षकांचं त्याला पाठबळ मिळालं. आपण या ठिकाणी एकटं उभं नसून मागून प्रेक्षकांनी टेकू लावला आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलो असं अशोक सराफ यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, “कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले.”

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटके यशस्वी ठरले. आज कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही, असे सुंदर मिश्रण अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते.”

अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. सत्तरच्या दशकात अशोक सराफांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य केलं.

error: Content is protected !!