दैव किंवा नशीब यासंबंधी जनमानसात खूप गैरसमज आहेत. दैव किंवा नशीब आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर उगवत नाही. माणसे जीवनात सतत कर्म करीत असतात. विचार- उच्चार-आचार ही कर्माची तीन तोंडे आहेत. निसर्गाचे नियम व माणसांची कर्मे (actions) यांचा परस्पर संबंध अत्यंत महत्वाचा आहे.

आपण जी कर्मे (actions) करतो, ती कर्मे निसर्गाच्या नियमांना गती देतात व त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात. ही नियती जेव्हां फलद्रुप होते तेव्हां ती सुख-दुःखाच्या रुपाने माणसाच्या अनुभवाला येते.याचाच अर्थ असा की, माणूस जी कर्मे करतो त्या कर्मातूनच त्याची नियती निर्माण होत असते.

तीच नियती त्याच्या जीवनावर प्रभाव टाकून माणसाचे जीवन घडवीत किंवा बिघडवीत असते. नियती दोन प्रकारची असते. माणसाच्या शुभ कर्मातून जी नियती निर्माण होते, ती शुभ नियती होय. याच्या उलट अशुभ कर्मातून जी नियती निर्माण होते ती अशुभ नियती होय.शुभ नियती माणसाचे भले करते तर अशुभ नियती माणसाचे वाटोळे करते.

म्हणजेच चांगल्या कर्मातुन शुभ नियती तर वाईट चुकिच्या कर्मातुन अशुभ नियती निर्माण होते आणि तिच नियती सुख-दु:ख रुपाने माणसाच्या वाट्याला येते म्हणून कर्म करताना सावध, कारण  “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!