वडगाव मावळ :
सगळं काही सांगून जाणारा आमचा जीवलग..मैत्रीदिनाच्या पूर्वेला..आम्हाला काहीच न सांगून गेला..तो कधीच परत न येण्यासाठी…आमची ही मैत्री अशीच अर्ध्या वर राहिली…मैत्रीदिनाच्या पूर्वीच त्याने आमची मैत्री सोडली…अशा भावना नाणे मावळातील अनेक तरूणांनी व्यक्त केल्या..या भावना व्यक्त करताना त्यांचे ओठ थरथरत होते. हातापायाचा थरकाप उडत नाही आणि डोळे पाण्याने डबडबले होते.

सर्वांचा लाडका श्रीकांत उर्फ भाऊ गायकवाड यांचे शनिवारी ता.५ ला अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाची वार्ता समजताच त्याचा मित्रपरिवार कांब्रेला धावून आला.जी गत त्याच्या मित्रांची झाली ,त्या पेक्षा भयंकर  अवस्था आई,वडील,भाऊ,बहिणी, पत्नी,मुले,चुलते आणि आप्तेष्टांची झाली. लाडक्या भाऊच्या जाण्याने गायकवाड कुटुंबिय दु:खात बुडाले. त्यांच्या दु:खाचा डोह खोल आहे. त्यांच्या आक्रोशाला कोण थोपवणार.

कंपनीला सुट्टी असल्याने सकाळीच तो शेतावर भातातील गवत काढण्यासाठी गेला आणि गवत काढत असताना अंगावर विद्युत वाहिनी तार पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  संपूर्ण गावाचा लाडका ‘भाऊ’ असलेल्या या  तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू  होईल असे स्वप्नात कोणाच्या आले नसेल.सर्वाशी प्रेमाने,आपुलकीने आणि तितक्याच आदराने बोलणा-या भाऊंचे जाणे जीवाला चटका लागून जाणारे आहे.

श्रीकांत गणपत गायकवाड (वय ३३, रा. कांब्रे नामा ता.मावळ जि. पुणे) असे विजेच्या शॉक ने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीकांत उर्फ भाऊ हा खाजगी कंपनीत चिंचवड येथे काम करत होता, शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने शेतात कामाला गेला होता. शेतात भातातील गवत काढत असताना अंगावर महावितरणची विद्युत वाहिनी तुटून पडली आणि  विजेच्या तीव्र झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली परंतु याबाबत कोणालाही समजले नाही. दुपारच्या वेळी बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी व्यक्तीला भाऊ शेतात पडला असल्याचे दिसले, त्यानंत त्याने ही माहिती भाऊच्या कुटुंबाला दिली. शवविच्छेदन केल्यानंतर भाऊ च्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भाऊच्या मागे पत्नी, दोन लहान मुलं, दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे, गावात भाऊ नावाने ओळखला जाणारा श्रीकांत हा शांत व अत्यंत प्रेमळ स्वभावाचा होता त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे मावळ तालुक्यातील विद्युत विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पावसाळ्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, धोकादायक विद्युत खांब, वीज वाहिन्या यांची वेळीच दुरुस्ती केली जात नाही. वारंवार जीवित व वित्त हानीच्या घटना वारंवार होत आहेत. धनिकांना विद्युत पुरवठा त्वरित मिळतो, शेतकरी व गरिबांना लवकर वीज मिळत नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यावर वीज कर्मचारी फोन उचलत नाही. धोकादायक विद्युत खांब व वीज वाहिन्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

भाऊंच्या जाण्याने या कुटूंबाचा आधार गेला,शेतात जाऊन कष्ट करायची ही काय त्याने चूक केली काय? महावितरणच्या गलथान कारभाराचा झटका गायकवाड कुटुंबियांना बसला आहे. महावितरणने या घटनेचे गांभीर्य ओळखून मावळ तालुक्यातील सर्व नादुरूस्त वीज वाहिनी,ट्रान्स्फर,डीपी बाॅक्स,लोखंडी व सिमेंटचे वीज खांब याचे सर्वेक्षण करून नादुरूस्त बाबी काढून टाकाव्यात अशी मागणी होत आहे.

भाऊ गायकवाड यांना ज्या भागात वीजवाहिनी तुटून जीव गमवावा लागला त्यातच परिसरात वीजवाहिनी तुटून जनावरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी कांब्रे वीजवाहिनी तुटून ही दुदैवी घटना घडली. त्याच दिवशी कांब्रे गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या थोरण गावातील सर्वच घरांना वीजेचा शाॅक बसत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

error: Content is protected !!