व्यसन म्हणजे दैन्य, दु:ख, दारिद्र्य अन रोगाला आग्रहाचे निमंत्रण
विकत घेतलेली पीडा म्हणजे व्यसन.दैन्य,दुःख,दारिद्र्य व रोग यांना दिलेले खास आमंत्रण म्हणजे व्यसन.व्यसनाधीन माणसे शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखी असतात आणि म्हणूनच निर्व्यसनी माणसांना व्यसनी करण्यासाठी ते सदैव टपलेले असतात.
“व्यसनाधीन माणसे स्वत:च्या हातांनी स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका-पोरांना दु:खाच्या खाईत लोटतात,हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात’,हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय.
जो मित्र आपल्याला व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करतो,तो मित्र नसून सात जन्माचा शत्रू आहे हे ओळखून व वेळीच सावध होऊन त्याच्यापासून सात पावले दूर रहाण्यात माणसाचे खरे हित आहे.
फुकट मिळते ते गिळायचे’ ही प्रवृत्तीच माणसांना व्यसनाधीन करण्यास कारणीभूत ठरते.थोडी थोडी’ करता करता ‘दारूची गोडी कधी लागली व जीवनाची गाडी रूळावरून कधी घसरली’ हे ह्या गड्याला कळलंही नाही.भीड भिकेची बहीण’ हे सत्य लक्षात घेऊन व्यसनी माणसांची भीड न बाळगण्यात माणसाचे खरे कल्याण आहे.
व्यसनाधीन होऊन दुःखाचा विसर पडत तर नाहीच,उलट त्या व्यसनातून दुःखाचा प्रचंड सागर निर्माण होऊन माणसे संसारासकट त्यात बुडून मरतात.गलिच्छ व्यसनांच्या आधीन होऊन शरीराचे गटार करणे किंवा ईश्वरभक्ती करून शरीराचे मंदिर करणे हे सर्वस्वी माणसाच्या स्वाधीन आहे.मन माझ्या स्वाधीन आहे असे म्हणतच माणूस व्यसनाधीन होतो.
प्रपंचात स्वास्थ्य प्राप्त झालेले लोक जर परमार्थाकडे वळले नाहीत तर ते जीवनात अस्वस्थ होऊन व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता असते.व्यसन म्हणजे दैन्य, दु:ख, दारिद्र्य व रोग यांना आग्रहाचे खास निमंत्रण होय.”मन माझ्या ताब्यात आहे’ असे म्हणणारी माणसे व्यसनांच्या ताब्यात कधी जातात व तोबा तोबा म्हणण्याची पाळी त्यांच्यावर कधी येते,हे त्यांना समजतही नाही.
दारूच्या पेल्यात दुःख बुडत तर नाहीच उलट त्याच दारूच्या पेल्यातून दुःखाचा अजगर निर्माण होऊन तो व्यसनाधीन माणसांना त्यांच्या संसारासकट गिळून टाकतो.दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीन होणे हा मार्ग नसून ईश्वर स्मरण करणे हाच खरा मार्ग होय.व्यसन म्हणजे दुःखाला आमंत्रण.
माणूस प्रथम दारूला गिळतो व नंतर दारूच अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करून माणसाला त्याच्या संसारासकट पूर्ण गिळून टाकते.जगात सर्वात मोठे आश्चर्य हे की इतरांना दारूच्या व्यसनाधीन होऊन स्वत:च्या संसाराची स्वत:च्या हाताने अक्षरशः राखरांगोळी करताना पाहून सुद्धा लोक त्याच मार्गाने जातात.समाज पुरुषाला जडलेला कॅन्सर म्हणजे व्यसन.
सद्गुरु श्री वामनराव पै
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन