कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे !
हृदयी प्रगटे रामरूप !!

विषय तो त्यांचा झाला नारायण
नामस्मरणाचा महिमा सर्वच संतांनी एकमुखाने वर्णन केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हे ही आग्रहाने प्रतिपादिले आहे की, सद्गुरुना शरण जाऊन त्यांच्याकडून नाम घेतल्याशिवाय साधकाला तरणोपाय नाही.

थोडक्यात, सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरणाचा अभ्यास केल्याशिवाय साधक साक्षात्काराच्या ध्येयाप्रत पोहोचू शकत नाही.वास्तविक, नामाचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याचे सतत अखंड स्मरण केले तर साधक सद्गुरू मार्गदर्शनाविना निश्चितपणे ध्येयाप्रत पोहोचेल. परंतु वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, सामान्य साधक असे अखंड नामस्मरण करू शकत नाही.

अपवादात्मक एखादा विरळाच. सर्वसाधारण नियम असा आहे की, संतसंगतीशिवाय नाम मिळत नाही व मिळाले तरी टिकत नाही. सद्गुरुंकडून नाम घेऊन सुद्धा साधक त्या नामाचे अखंड स्मरण करू शकत नाही, आणि म्हणूनच मर्यादित काळात केलेले नामस्मरण जर एका विशिष्ट प्रक्रियेने केले तर साधकाला नामस्मरणाचे अतिन्द्रिय अनुभव त्वरित येऊन त्याला नामाची गोडी लागते, जेणे करून त्याच्या हातून नामस्मरणाचा अखंड अभ्यास आपोआप होऊ लागतो. नामस्मरणाची ही विशिष्ट प्रक्रिया सद्गुरुंकडून शिकून घ्यावयाची असते.

नाम म्हणजे राम, जो सर्व सुखाचा आराम असा आत्माराम शास्त्रीय भाषेत सांगावयाचे झाल्यास नाम म्हणजे स्वरूप व स्मरण म्हणजे अवधान किवा ध्यान म्हणजेच ध्यास, नामस्मरण म्हणजे स्वरूपाचा ध्यास आपले मूळ स्वरूप- शिवरूप शुद्ध स्वरूप ह्याची अखंड जाणीव म्हणजेच नामस्मरण, वास्तविक,

तत्वत: आपल्या ठिकाणी मूलतः असणारी जी शुद्ध जाणीव ती आत्माच आहे, तीच आपले स्वरूप आहे. परंतु मायेच्या प्रभावाने व देहबुद्धिच्या स्पर्शाने शबल झालेली ही जाणीव प्रत्यक्षात मात्र परमात्मा या पदावरून च्युत होऊन घसरत घसरत जीवात्मा या पदावर येऊन स्थिरावते. जीवात्मा हे जाणीवेचं अशुद्ध स्वरूप असून ते विषयांना अशा अवस्थेत विचार – विकार- आकार यांनी अधिकच गढूळ होते.

परंतु सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली जाणीवेने स्वस्वरूपाचा वेध घेण्याचा सातत्याने अभ्यास केल्यास जाणीव विषयांना विन्मुख होऊन स्वरूपी हळुहळू स्थिर होण्याच्या मार्गास लागते. त्या अवस्थेत तिच्या ठिकाणी असणारी पूर्वीची गढूळता म्हणजेच विचार-विकार आकार आपोआप गळून जावू लागतात. त्या नंतरच्या अधिक तीव्र अभ्यासाने जाणीवेच्या ठायी जाणीवेचे शुद्ध, उज्ज्वल व प्रतिभा किंवा दिव्य स्वरूप स्वानंदासह उदयाला येते.

जाणीवेला जाणीवेच्या ठिकाणी या दिव्य स्वरूपाची अनुभूती येणे यालाच ईश्वर साक्षात्कार असे म्हणतात. तुकाराम महाराज या अवस्थेचे गोड वर्णन करतात,

विषय तो त्यांचा झाला नारायण।
नावडे जन धन माता पिता ।।

अडाणी माणसे या संत वचनाचा खालीलप्रमाणे भलताच अर्थ लावतात. “विषयांचे ठिकाणी त्यांना म्हणजे संतांना नारायण देव दिसू लागतो किंवा विषयांतून त्यांना नारायणाचे दर्शन घडू लागते” असा किंवा तत्सम विक्षिप्त व संपूर्ण चुकीचा अर्थ कांही लोक लावतात. हा अर्थ किंवा परमार्थ नसून परम अनर्थ मात्र आहे.

“नावडे जन धन माता पिता” या तुकाराम महाराजांच्या उक्तीवरूनच वरील अर्थ हा कसा अनर्थ आहे हे सिद्ध होते. आणखी एक चुकीचा अर्थ या तुकाराम महाराजांच्या उक्तीचा लावण्यात येतो तो असा. विषयांच्या द्वारे जे सुख मिळते ते प्रत्यक्षात देवाचेच सुख असते. तत्वतः हा अर्थ चूक नाही. परंतु प्रत्यक्ष व्यवहाराच्या व अनुभव्यवहाराच्या
दृष्टिकोनातून सूक्ष्म दृष्टिने पाहिल्यास मात्र हा अर्थ संपूर्ण चुकीचा असून स्वतःला व इतरांना फसविणारा आहे.

हे सत्साधकांनी तरी निदान विसरू नये, याचे कारण असे की, विषयांच्या आधाराने सुख भोगण्यात एका बाजूने देवाचा विसर पडतो (जर मुळात त्याला देवाचे स्मरण असेल तर) व दुसऱ्या बाजूने विषयांची आसक्ती अधिकाधिक वाढू लागून शेवटी तो त्यांचा गुलाम होऊन रहातो. म्हणून याचा खरा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे, नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊन परमार्थ मात्र राहील दूर.

आज आपल्या सर्व इंद्रियांचे सुखाचे विषय निरनिराळे आहेत. या विषयांचे ठिकाणी इंद्रियांच्या द्वारे मन जेव्हां स्थिर होते तेव्हां मनाच्या ठायी सुखाच्या संवेदना निर्माण होतात. या सुखाच्या संवेदना स्वस्वरूपात उदय पावून मनापर्यंत आलेल्या असतात. विषयांच्या माध्यमातून इंद्रियांद्वारा आपण हे सुख अनुभवतो म्हणून याला विषयसुख असे म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात तो प्रकार याच्या नेमका उलटा आहे. ते सांगतात “नारायण” हाच आमच्या इंद्रियांच्या सुखाचा विषय झाला आहे.

याचा अर्थ असा की मन इंद्रियांद्वारा विषयाकडे न जाता ते इंद्रियांना डावलून सरळ (Direct) स्वरूपानंदाला चिकटून रहाते. जळवा जशा अशुद्ध रक्तासाठी अंगाला चिकटून रहातात त्याचप्रमाणे हे मन स्वानंदासाठी स्वरूपाला चिकटून रहाते. तुकाराम महाराज सांगतात,*

*लांचावले मन लागलीसे गोडी |*
*ते जीवे न सोडी ऐसे झाले ।।*

*एकनाथ महाराज तेच सांगतात,*

*चित्त विसरोनी चित्ता । जडोनी ठाके भगवंता । मनाची मोडली मनोगतता। संकल्प विकल्पता करू विसरे ।।*

*२) चित्त चाकाटले स्वरूपा माझारी । ते न निघे बाहेरी ऐसे झाले ।।*

*अशा रीतीने मन जेव्हा स्वस्वरूपात मुरते तेव्हा तेच मन उत्पन्न स्वरुपाने स्वानंदासह सर्व इंद्रियांतून स्फुरू लागते. या अवस्थेत सर्व इंद्रियांचा सुखाचा विषय फक्त एकच असतो व तो म्हणजे नारायण म्हणजेच स्वरूपानंद होय का स्वानंद जेव्हा निरनिराळ्या इंद्रियांतून प्रगट होऊ लागतो तेव्हा सत्साधकाला अतिन्द्रिय अनुभव येऊ लागतात. हा स्वानंद डोळ्यांतून वहातो तेव्हा  डोळ्यात आनंदाश्रू येतात व प्रकाश दिसू लागतो.
*
हा स्वानंद कानांतून प्रगट होती तेव्ह निरनिराळे नाद ऐकु येतात; तो नाकातून प्रसवतो तेव्हां निरनिराळे सुगंध येऊ लागतात, तो जिव्हेंच्या द्वारा प्रगट होतो तेव्हां अमृतरसाचा अनुभव येतो. हाच स्वानंद हातांतून प्रसवतो तेव्हां तो आनंदाने टाळी वाजवू लागतो व तोच पायातून प्रगट होतो तेव्हा आनंदाने नाचू लागतो. म्हणूनच संत सांगतात.*

१) कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे ।*
हृदयी प्रगटे रामरूप ।।

२) जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस ।*
*अमृत जयास फिके पुढे ।।

3) विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जन धन माता पिता ।।*

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!