गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमा
व्यास पौर्णिमेला पारमार्थिक जीवनात असाधारण महत्त्व आहे.साधकाच्या जीवनात या दिवसाला मोलाचे स्थान आहे.आपल्या अंत:करणात वसत असलेली वासना किंवा आस ही खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याशिवाय आपले अपूर्ण जीवन पूर्ण होत नाही.

देह आणि देव यांच्या मिलनातून ‘दे आणि हवं’ हे अपूर्णत्व म्हणजेच हा संसार निर्माण झाला.एक हात ‘दे’ म्हणत पुढे करतो व इच्छित विषय मिळाला की, पुन्हां ‘हवं’ असे म्हणत दुसरा हात पुढे करतो. अशा रीतीने सामान्य माणूस ‘दे-हवं’ या संसारात गुंतून गेला आहे. त्याच्या जीवनाला ‘दे-हवं’ चा स्वल्पविराम-सर्प विळखा पडला आहे.

या सर्पाचा जोपर्यंत माणसाला विळखा बसला आहे तोपर्यंत त्याला विराम-आरामआत्माराम प्राप्त होत नाही.म्हणजेच त्याचे जीवन पूर्ण होत नाही.त्याच्या जीवनाची पौर्णिमा होत नाही.ज्यांच्या अंत:करणात भगवंताचा वास ते ‘व्यास’ व ज्यांच्या अंत:करणात विषयांचा वास ते ‘हव्यास’.खऱ्या अर्थाने जगात या फक्त दोनच खऱ्या जाती आहेत.हवेपणा गळून पडल्याशिवाय ‘हव्यास’ हा व्यास’ होणार नाही.

हवेपणा म्हणजेच वासना.या वासनेचा खड्डा एवढा खोल आहे की,त्यात काहीही व कितीही टाकले-भरले तरी तो खड्डा भरून निघत नाही.कशाच त-हेने या वासनेची तृप्ती होत नाही.या वासनेचा खड्डा भरून काढण्याचे सामर्थ्य फक्त एकाच ‘वस्तूत’ आहे.ती वस्तू म्हणजे स्वानंद.सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रक्रियेने नामस्मरणाचा अभ्यास केला असता स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वानंदाचे जागरण होते व तो स्वानंद वासनेचा खड्डा संपूर्ण भरून काढतो.

इतकेच नव्हे तर तिच्या स्वरूपातच पूर्ण पालट घडवून आणतो.या वासनेचे म्हणजेच विषयासक्तीचे रूपांतर भगवद्भक्तीत होते. विषयांचा हव्यास सुटतो व साधकाच्या अंत:करणात भगवंताचा ‘वास’ होऊन तो व्यास पदावर आरूढ होतो.व्यास पौर्णिमा या विषयाकडे आणखी एका दृष्टिकोनातून पहाणे आवश्यक आहे.व्यास पौर्णिमेला गुरू पौर्णिमा असेही संबोधण्यात येते.जीवनात सुखाची पौर्णिमा साधण्यासाठीच गुरू पौर्णिमा साजरी करावयाची असते.

गुरू म्हणजे गुप्त रूप आपल्या हृदयातच असते.या गुप्त रूपाची जेव्हां ओळख पटते तेव्हां जीवनातील दु:ख गुप्त होते व सुख प्रगट होते.वास्तविक,सुख हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे व दुःख हे आगंतुक आहे.पण आज सर्वांची परिस्थिती उलट झाली आहे.याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला देवाचा विसर पडला हे होय.देव म्हणजे दिव्य रूप,आपले स्वरूप-शिवरूप,हेच वास्तविक दिव्य रूप होय.या दिव्य स्वरूपाची प्राप्ती होणे-प्रचीती येणे म्हणजेच देवाचा साक्षात्कार होणे होय.पण या मूळ दिव्य स्वरूपाला सोडून आपण भलत्याच दिशेने वाहत चाललो आहोत.

यालाच भव नदी असे म्हणतात.ही भव नदी पार करून जाणे फार महत्त्वाचे आहे. भव व भाव यांचा परस्पर फार महत्त्वाचा संबंध आहे.भाव सरला की भव सुरू होतो व भाव धरला की भव सरतो.म्हणूनच संत सदैव सांगत असतात की, “भाव धरा रे आपुलासा देव करा रे”.हा भाव कसा धरायचा हे परमार्थात महत्त्वाचे आहे;बाकीच्या सर्व गोष्टी फालतू आहेत.“मी आहे’ असे जे आपल्याला मनापासून वाटते तेच भव नदीचे मूळ आहे. आपल्या सर्व दुःखाला हेच कारण आहे.

वास्तविक,”आहे” हेच फार महत्त्वाचे आहे.पण हे “आहे” ते कोण आहे हेच आपणाला उमजत नाही.वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की,“जो आहे” तो केवळ देवच आहे आणि “मी आहे” हीच केवळ कल्पना आहे.ज्याप्रमाणे राहू या राक्षसाचे खग्रास ग्रहण सूर्याला लागते त्याप्रमाणे कल्पनेचे खग्रास ग्रहण आत्मसूर्याला,देवाला म्हणजेच आपल्या दिव्य स्वरूपाला लागते.लागलेले ग्रहण सुटण्यासाठी “दे दान सुटे ग्रहण” असा पुकार केला जातो.त्याप्रमाणे देवाला लागलेले कल्पनेचे ग्रहण सुटण्यासाठी सद्गुरुंना गुरूदक्षिणेचे दान करावे लागते.

गुरुला दक्षिणा द्यायची म्हणजे काय करायचे?
दक्ष राहून गुप्त रूपाकडे-स्वरूपाकडे लक्ष देणे  म्हणजे गुरुदक्षिणा.खरी गुरुदक्षिणा हीच होय व खऱ्या सद्गुरूंना हिच गुरुदक्षिणा पाहिजे असते.हे दान दिले की कल्पनेचे ग्रहण तात्काळ सुटते व आपल्याला आपल्याच दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार होतो.

सद्गुरु श्री वामनराव पै

error: Content is protected !!