समरसतेच्या पाऊस मैफलीत रसिक चिंब
पिंपरी :
काहीसा लांबलेला पाऊस पिंपरी – चिंचवड परिसरात कोसळू लागला आणि या पार्श्वभूमीवर समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या नृत्य, नाट्य, संगीत, अभिवाचन आणि काव्य यांची रेलचेल असलेल्या पाऊस मैफलीत रसिक भिजून चिंब झालेत.

शिव समाज मंदिर सभागृह, गणेशनगर, थेरगाव, चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी होते; तसेच माजी नगरसेविका माया बारणे, पिंपरी – चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषाली मरळ, ज्येष्ठ नागरिक संघ – गणेशनगरचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

त्याचबरोबर साहित्य, संस्कृती आणि समाजकारण या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
“घन घन माला नभी दाटल्या…” या साई नारायण या युवकाने गायलेल्या पहिल्याच गीताने रसिकांची मने जिंकली; तर दुर्गा सुतार या युवतीने गायलेल्या “रिमझिम पाऊस पडे सारखा…” या गीताला बाहेर पावसाच्या सरींची अन् सभागृहात रसिकांच्या टाळ्यांची साथ लाभली.

सिद्धार्थ वैद्य याच्या “निशाणा तुला दिसला ना..‌.” या गीताला वन्स मोअर मिळाला.‌ सुनीता साळुंखे यांच्या “आनंद या जीवनाचा…” या समरसून सादर केलेल्या गीताने श्रोत्यांचा श्रवणानंद द्विगुणित केला; तर स्नेहा आढळराव आणि ज्ञानेश्वरी कचगवंडे या मैत्रिणींच्या युगुलगीताला उत्तम दाद मिळाली.

प्रा. अनिता सुळे यांच्या पावसावरील ललितबंधाचे अभिवाचन आणि स्मिता कुलकर्णी यांचे ‘पावसाचं वय काय?’ या मिस्कील शैलीतील सादरीकरण रसिकांना पावसात भिजल्याची गोड शिरशिरीची अनुभूती देणारे होते. चित्तवेधक पदन्यास घेत प्रिशा चित्रे या किशोरीने सादर केलेल्या एकल नृत्याने तसेच विदिशा जोशी, श्रीया नवगिरे, अनुश्री गोरे आणि आर्या गायकवाड या विद्यार्थिनींच्या समूहनृत्याने मैफलीच्या पूर्वरंगाचा कळसाध्याय गाठला. आशुतोष चाटी या युवकाने तबल्यावर नेटकी साथसंगत केली.

मैफलीच्या उत्तरार्धात समृद्धी सुर्वे यांच्या सूत्रसंचालनाखाली डॉ. सुधीर काटे, डॉ. प्रतिभा झगडे, अंजली नवांगूळ, सुनीता बोडस, कविता काळवीट, राजेंद्र भागवत, स्मिता धर्माधिकारी, नंदकुमार मुरडे यांनी पाऊस या विषयावरील वैविध्यपूर्ण कवितांचे सुंदर सादरीकरण केले. अरविंद दोडे यांनी महाकवी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ या अभिजात साहित्यकृतीचे अंतरंग उलगडून सांगितले.

सुरेंद्र विसपुते यांनी आपल्या अमूर्त शैलीतील चित्राच्या रेखाटनातून मैफलीची सप्तरंगी अनुभूती उपस्थितांना दिली. सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. मधू जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “संस्कृती ही साहित्यातून प्रकट होते!” असे मत व्यक्त केले.

शोभा जोशी, जयश्री श्रीखंडे, पंजाबराव मोंढे, कैलास भैरट, सीताराम सुबंध, नीलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, वेदान्ती घुमरे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!