व्यथांची वादळे’चा लोकार्पण सोहळा संपन्न
पिंपरी:
प्रा. उद्धव महाराज लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘व्यथांची वादळे’ या गझलसंग्रहाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक डॉ. नज़ीर फतेहपुरी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच मराठी, उर्दू भाषेतील अनेक मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.
याप्रसंगी रमण रणदिवे यांनी ‘व्यथांची वादळे’ या गझलसंग्रहातील विविध सौंदर्यस्थळे नमूद करून “वृत्तबद्ध आणि निर्दोष लेखनाचा हा उत्तम वस्तुपाठ आहे!” असे मत व्यक्त केले. डॉ. नज़ीर फतेहपुरी यांनी आपल्या मनोगतातून, ‘प्रा. उद्धव महाजन यांची आजपर्यंत उर्दू भाषेत सोळा पुस्तके प्रकाशित झाली .
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, उत्तरप्रदेश उर्दू अकादमी, बिहार उर्दू अकादमी या संस्थांनी त्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे!’ अशी माहिती दिली. प्रा. उद्धव महाजन यांनी, “माझ्या साहित्यलेखनाच्या वाटचालीत अनेक मित्र आणि सुहृद यांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः डॉ. नज़ीर फतेहपुरी यांच्या उर्दूतील मार्गदर्शनामुळे माझा इथपर्यंतचा लेखनप्रवास यशस्वी झाला!” अशा शब्दांतून ऋण व्यक्त केले.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “प्रा. उद्धव महाजन यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेतून साहित्यनिर्मिती करून राष्ट्रीय एकात्मता साधली आहे!” असे गौरवोद्गार काढले.
नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले. शाल, श्रीफळ आणि फळांची परडी प्रदान करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर, सुधीर कुबेर, अशोक भांबुरे, मसूद पटेल, रघुनाथ पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. शर्मिला महाजन यांनी आभार मानले.