शरीर एक आनंदाचा डोह
जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत आनंदाचा शोध करीत असतो.त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा अनुभव असा असतो की,आनंदाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्याचे आयुष्यच संपते,पण आनंद हाताला लागत नाही.
जमिनीवर पडलेला पारा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर तो हाताला लागतो पण हातात येत नाही.त्याचप्रमाणे आनंदाचा शोध करणाऱ्या माणसाला आनंद अगदी हातात आल्यासारखा वाटतो पण प्रत्यक्षात मात्र तो आनंद त्याच्या हातात येत नाही.वास्तविक,ज्या आनंदासाठी माणूस जीवनभर धडपड करीत असतो.
तो आनंद प्रत्यक्षात त्याचे स्वरूपच असते. आनंद हे माणसाचे स्वरूप आहे याचा अर्थ असा की,आनंद हा त्याच्यापासून वेगळा नसतो. याचाच अर्थ असा की,ज्या आनंदाचा माणूस शोध करतो तो आनंद तो स्वतःच असतो.अशा परिस्थितीत स्वतःचे ठायी आनंदाचा वेध न घेता माणूस तो आनंद अन्य ठिकाणी शोधू लागला तर तो आनंद त्याला मिळेलच कसा ?
तीर्थयात्रा,उपास-तापास, व्रत- वैकल्ये,यज्ञयाग,भजन-पूजन करून हा आनंद मिळविण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना सरते शेवटी अपयश प्राप्त होते.विविध व्यसनांच्या आधीन होऊन माणसे हा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात,परंतु प्रत्यक्षात मात्र आनंद प्राप्त होण्याऐवजी त्यांना दुःखी जीवन प्राप्त होते.
त्याचप्रमाणे सत्ता संपत्तीच्या बळावर हा आनंद मिळविण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना कलह,क्लेश,रोग,संताप, पश्चाताप,टेन्शन वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरे जावे लागते. थोडक्यात,आनंदाच्या प्राप्तीसाठी शोधलेले वरील सर्व मार्ग व्यर्थ होत असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.
दुसरा मुद्दा असा की,हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी परमार्थाच्या प्रांतात अनेक प्रकार सांगितले जातात.उदाहरणार्थ, ध्यानधारणा,योगाभ्यास,मंत्रजप, भजन,कीर्तन वगैरे हे सर्व मार्ग आपापल्यापरी जरी खरे असले तरी ते सर्वसामान्य लोकांना पचवायला कठीण जातात.याचे मुख्य कारण एकतर यापैकी कांही साधने वेळकाढू,कष्टप्रद व कठीण असतात तर अन्य दुसरी साधने परावलंबी असतात.
इतकेच नव्हे तर वरील सर्व प्रकारची साधने करण्यास व त्यात यश प्राप्त करून घेण्यास वैराग्याची,विरक्तीची आवश्यकता असते.अर्थात् ही विरक्त अवस्था किती लोकांना प्राप्त होऊ शकते हा संशोधनाचा एक मोठा विषय होऊ शकेल.या संदर्भात जीवनविद्येचे मार्गदर्शन आगळे आणि वेगळे अशा प्रकारचे आहे.
वर म्हटल्याप्रमाणे माणूस ज्या आनंदाच्या शोधात असतो तो आनंद तो स्वतःच असतो.मानवी शरीर हा साक्षात् आनंदाचा गड्डा आहे,सर्व सुखाचा आराम आहे, आनंदाचा डोह आहे,सुखाचा सागर आहे. संत सांगतात-
•आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदाचे अंग आनंदची ।।*
• तैसा हृदयामध्ये मी राम । असता सर्व सुखाचा आराम । की भ्रांतासी काम विषयावरी ? ।।*
•सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।*
या संदर्भात डॉ. मर्फी यांचे वचन चिंतनीय आहे,ते सांगतात.
“Infinite riches are all around you if you open your mental eyes and behold the treasure house of infinity within you.There is a goldmine within you from which you can extract everything you need to live life gloriously,joyously and happily.”*
थोडक्यात,मानवी शरीर आनंदाचा डोह आहे,नित्य स्फुरद्रुप असणारे ‘मी’ हे आत्मतत्त्व आनंद तरंग आहे आणि सर्व अंगच आनंदस्वरूप आहे.या संदर्भात तुकाराम महाराजांचे वचन अत्यंत बोधप्रद
तुका करी जागा । नको चांचपू वावुगा । आहेस तू अंगा । अंगी डोळे उघडी ।।
– सद्गुरू श्री वामनराव पै.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस