ग्रंथ वाचल्या शिवाय संत समजत नाही!आणि संत समजल्याशिवाय भगवंत भेटत नाही!
मित्रांनो,
  संतांनी समाजाचा संसार सुंदर करण्याचा ध्यास घेतला होता! त्यांची प्रत्येक ओवी आणि अभंग हा  सुंदरतेचा श्वास होता! अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके ही संत  ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा होती.
 
माऊली  म्हणतात की– आपण सारी प्रभूची लेकर आहोत! माणुसकी आपलं कर्म आहे! प्रत्येकाने आपलं सुख दुःख वाटून घ्यावं! एकमेकांशी सुसंवाद साधावा! एवढेच नव्हे तर– जे जे भेटे भूत-ते ते जाणिजे भगवंत! ही त्यांची शिकवण होती! हे सर्व संत सुदृढ सुसंस्कृत समाजाचे लोक शिक्षक होते.

आपल्यात वसत असलेल्या आत्मिक  सौंदर्याचा साक्षात्कार घडवणं हे त्यांचं जीवित कार्य होतं! म्हणून त्यांनी मानवी देह हेच मांगल्याचं मंदीर जाणलं! आणि  त्याच मनाच सौंदर्य हा एक अलंकार मानला! म्हणून ह्या बाबत ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुरेख ओवी सांगितलेली आहे.

त्या ओवीचा अर्थ  आहे की– ज्याप्रमाणे अंगच्या सौंदर्यामुळे आपलं शरीर अलंकाराच भूषण बनत की  अलंकारमुळे  शरीराला शोभा येते  हेच नेमकं सांगता येत नाही! या जीवन सौंदर्यासाठी  आपल्या मनावर अतिउत्तम संस्कार करावे लागतात! हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे! आणि तो आपल्या संस्कृतीच्या मंत्राला धरून आहे.

मित्रांनो- आपली संस्कृती म्हणते-” सत्यम- शिवम सुंदरम”- म्हणजेच सत्याची कास धरा! शिवाची आराधना करा आणि सौंदर्याची निर्मिती करा! असाच संदेश संत गाडगेबाबांनी दिला होता! बाबा हे कोणत्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते! पण ते सुंदरतेचे उपासक होते! पुरस्कर्ते होते! दिवसा ते हातात खराटा घेऊन  गावचा परिसर स्वच्छ करायचे.

तर रात्री दगडांचा टाळ घेऊन मनाच्या स्वच्छतेसाठी कीर्तन करायचे! आपल्या कीर्तनातून त्यांनी परिश्रमाच आणि परमार्थाच  संगमाच सुंदर दर्शन जनसामान्यांना घडवलं! अशा संतांचा संस्कार आपलं जगणं सुंदर करतो हाच आपल्या चिंतनाचा आजचा विषय आहे आणि तो इथेच संपतो म्हणून मी इथेच थांबतो! आपला (शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!