“ज्ञानेशांचा संदेश”
प्रथम आवृत्ती १९६१
सार्थ हरिपाठ अभंग २७ वा

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान।
समाधि संजीवन हरिपाठ।।

समाधीचे दोन प्रकार आहेत. एक संजीवन समाधी व दुसरी ताटस्थ समाधी. योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला “ताटस्थ” समाधी म्हणतात व हरिपाठाच्याद्वारे मिळणाऱ्या समाधीला “संजीवन” समाधी म्हणतात.

पहिल्या समाधीत योगी आपला ”मी” स्वरूपात विरवून टाकतो व त्या अवस्थेत त्याचा देह निश्चेष्ट राहून त्याची सर्व इंद्रिये-कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतरेंद्रिये तटस्थ असतात. काही वेळाने या समाधीचा भंग होतो व योगी पुनः “देहभानावर” येतो.

हरिपाठाने-नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे. या समाधीत साधकाचा ”मी” स्वरूपात विरून जात नाही, इंद्रिये तटस्थ होत नाहीत व देह निश्चेष्ट रहात नाही, तर याच्या उलट त्याचे आनंदघन स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात प्रकट होऊन जाणीवेची सर्व अंगे आनंदाने भरून टाकतात. या स्थितीत साधकाचा ”मी” आनंदस्वरूपात डुंबतो व देव भक्ताचा भक्तीचा सोहळा भोगण्यासाठी आपला ”मी” पणा देवाच्या कृपेने वेगळा ठेवतो. *तुका म्हणे देव भक्ताचा सोहळा।* *ठेवूनि निराळा दावी मज।।*

या समाधी स्थितीत साधकाची इंद्रियें तृप्त व शांत झालेली असतात व त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो. या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून अलिप्त असतो व लौकिक दृष्ट्या तो इतर सर्व माणसांसारखा दिसत असला तरी तो त्यांच्यापेक्षा आगळा असतो.
नामाचा धारक विष्णूरूप देख।
वैकुंठीचे सुख रूळे पायीं।।
किंवा
नामाची आवडी तोचि जाणा देव।
न धरी संदेह कांही मनी।।
ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
हरिपाठाने संजीवन समाधी मिळते. हे ज्ञान मला निवृत्तिनाथांच्या कृपेने लाभले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.

संजीवन समाधी देणारा असा हा हरिपाठ सर्वांनी कंठात धारण करावा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाला संदेश देतात,
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *🙏🪔"निवेदन"🌻*

हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींचा आकाराने छोटा पण शक्तीने मोठा असा अलौकिक ग्रंथ आहे. चांगदेव पासष्ठी, ज्ञानेश्वरी व अनुभवामृत या माऊलींच्या तीन ग्रंथांचा सुरेख त्रिवेणी संगम हरिपाठात झाला आहे. चांगदेव पासष्ठीतील चांग उपदेश, ज्ञानेश्वरीतील ज्ञान व अनुभवामृतातील अमृत-नामामृत, हरिपाठांत ओतप्रोत भरलेले आहे. हरिपाठ हा माऊलींचा सूत्रमय पद्धतीचा ओवलेला ग्रंथ आहे.

व्यासांची ब्रह्मसूत्रे, पातंजलीची योगसूत्रे, नारदांची भक्तिसूत्रे, त्याप्रमाणे हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची “नामसूत्रे” होत.
बुडती हे जन न देखवे डोळा।
हिताचा कळवळा येतो यांचा।।
अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला. या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचे तत्त्वज्ञान उभारले व त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर नामस्मरणाचा गोड उपदेश अत्यंत प्रेमळपणे सांगितला.

नामस्मरणाने नामधारकाला काय काय गोड फळे प्राप्त होतात व परमार्थ शिखरावर तो कसा सहज पोहोचतो याचे रसाळ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठांत केले आहे. माऊलींचा हरिपाठ वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. वैदिक धर्मात संध्येला जे महत्त्व आहे तेच भागवत धर्मात हरिपाठाला आहे. या छोट्या ग्रंथांत ज्ञानेश्वर माऊलींनी नामाचा महिमा मुक्त कंठाने गायिलेला आहे.

या ग्रंथातील भाषा वरवर दिसायला सोपी परंतु त्यातील अभंगांचा भावार्थ फार खोल आहे. हरिपाठ न समजता जरी वाचला तरी नामस्मरण केल्याचे श्रेय मिळते, कारण त्यात नामाशिवाय दुसरे काहीच नाही.

परंतु हरिपाठ समजून घेऊन वाचला तर त्यात अधिक आनंद आहे.

🙏 माझ्या सद्गुरु माऊलीने १९५२ साली समाधी घेतली व त्याच वर्षापासून माझी हरिपाठावर ठिकठिकाणी प्रवचने त्यांच्याच आशीर्वादाने सुरू झाली.

✅ मनसोक्त नामस्मरण करणे व हरिपाठाच्या द्वारे मुक्त कंठाने नामाचा महिमा गाणे हे जीवनाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी प्रवचने, कीर्तने, सामुदायिक नामसंकीर्तने, भजने व सामुदायिक हरिपाठ एकादशावर्तने ठिकठिकाणी सुरू केली. प्रस्तुत ग्रंथ ‘ज्ञानेशांचा संदेश’ हा सुद्धा त्याच ध्येयपूर्तीसाठी साकार झालेला आहे.

👏 मला अशी आशा आहे की, या ग्रंथाच्या वाचनाने हरिपाठातील अभंगांचा भावार्थ वाचकांना सुस्पष्ट होईल व त्यांना हरिपाठाची व हरिनामाची गोडी लागेल. हरीकृपेने ही आशा पूर्ण होवो, अशी देवाजवळ प्रार्थना आहे.

➡️ या ग्रंथाच्या निर्मितीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्या सद्भक्तांनी कायेने, वाचेने, मनाने व धनाने मला सहाय्य केले, त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. *--- सद्गुरू श्री वामनराव पै* सर्वसामान्यांत राहून सर्वसामान्य होणारे *👏दुर्मिळ सद्गुरू👏* *🙏स. प्र. (sp)1093*

error: Content is protected !!