“शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा."शरीर एक वास्तू

माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सदैव ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते. आपल्या लहानपणापासून आपण हे सर्व आपल्या वाडवडिलांकडून ऐकत आलेलो आहोत.

आपण जे करतो त्याला ही वास्तू ”तथास्तु” म्हणत असते, हे लक्षात घेऊनच आपले वाडवडील आपल्याला ‘‘शुभ बोल रे नाऱ्या” अशा शब्दात आपल्याला जागवीत असत. जीवन जगत असताना माणसे विचार-उच्चार-आचार करीत असतात आणि या सर्वांना ही वास्तू ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद देत असते.

या संदर्भात दुसरी एक संकल्पना अशी आहे की, अंतरिक्षामध्ये देवता वास करतात व या देवता आपण जे बोलतो-करतो त्याला ”तथास्तु तथास्तु” असे म्हणतात. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष वस्तुस्थिती आगळी आणि वेगळीच आहे. जीवनविद्या सांगते की,
”तू” शरीरात वास करतो म्हणून शरीर हीच तुझी खरी वास्तू होय. शरीराच्या द्वारा आपण जे काही विचार-उच्चार-आचार करतो त्या सर्वांना ही शरीररूपी वास्तू सदैव ”तथास्तु तथास्तु” असे म्हणत असते.

अंतरिक्षात देवता वास करतात याचा खरा अर्थ … माणसाच्या अंतर्मनात ज्या शक्ती आहेत त्या माणसाच्या सर्व कर्माना (Actions) ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद देत असतात.

या संदर्भात डॉ. मर्फी यांचे खालील वचन चिंतनीय आहे.
“The ignorance of mental and spiritual laws is the cause of all troubles. Though invisible the forces of the subconscious mind are mighty.”

थोडक्यात, अंतरिक्षात वास करणाऱ्या देवता म्हणजेच अंतर्मनात वास करणाऱ्या प्रचंड शक्ती होत. वास्तू ”तथास्तु तथास्तु” असे म्हणते, याचा अर्थ “तसा तू तसा तू” हा होय. तथास्तु म्हणजे तसा तू. ‘’तसा तू” म्हणजे कसा?

जसे तुझे विचार-उच्चार-आचार ”तसा तू” याचाच अर्थ असा की, तुझ्या विचार-उच्चार-आचारा प्रमाणेच तुझे जीवन घडत जाणार किंवा बिघडत जाणार.

दुसऱ्या अर्थाने या प्रश्नाकडे पाहता येते.
आपण ज्या विश्वात राहतो ते विश्व सुद्धा आपली वास्तूच होय. विश्वामध्ये माणसे जीवन जगत असताना इष्ट-अनिष्ट कर्मे (Actions) करीत असतात. या सर्व कर्मांना विश्व रूपी वास्तू ”तथास्तु तथास्तु” असे म्हणत असते.

याचा अर्थ असा की, माणसे विश्वामध्ये जीवन जगत असताना जी सत्कर्मे किंवा दुष्कर्मे करतात ती सर्व विश्वाकडून म्हणजे विश्वातील लोकांकडून बुमरँग होऊन त्यांच्याकडे परत येतात व त्यांच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरतात. म्हणून ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.

या शहाणपणाला अनुसरून सुखी जीवन जगायचे की मूर्खपणाच्या आहारी जाऊन दुःखी जीवनाला सामोरे जायचे हे तुझ्या हातात आहे – म्हणून जीवनविद्या सांगते.
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

✅ प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक वाटते.

एखादे घर किंवा वाडा भुताटकीने बाधित झालेला आहे, असे आपल्याला सांगण्यात येते, ऐकण्यात येते, वाचनात येते व बोलण्यात येते. ”भुताटकीने बाधित” याचा लोक असा अर्थ करतात की, त्या घरात किंवा वाड्यात भुते वास करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.

ज्या घरात किंवा वाड्यात भूतकाळात जे लोक राहत होते किंवा सध्या राहतात त्यांचा या प्रकाराशी संबंध असतो. त्या लोकांचे विचार-उच्चार-आचार जर अनिष्ट, नीच व दुष्ट असतील तर त्यांच्या कर्माचे सूक्ष्म ठसे (Subtle impressions) त्या घरात किंवा वाड्यात ठसले जातात. याचा परिणाम असा होतो की, त्या घरात किंवा वाड्यात प्रवेश करणाऱ्या माणसावर त्या दुष्ट व अनिष्ट ठशांचे कळत नकळत अनिष्ट परिणाम होतात.

म्हणूनच एखाद्या जुन्या घरात किंवा वाड्यात रहायला जाण्यापूर्वी तेथे पूर्वी राहणारी माणसे दुष्ट प्रवृत्तीची की सुष्ट प्रवृत्तीची होती याची योग्य ती चौकशी केल्याशिवाय त्या घरात किंवा वाड्यात रहायला जाणे हिताचे नसते.
(क्रमशः)
लेखक : सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1117

error: Content is protected !!