“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २७ वा”
भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे.
राम म्हणे वाटचाली। यज्ञ पाऊला पाऊली।।
धन्य धन्य ते शरीर।। तीर्थ व्रतांचे माहेर।।
नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जरूरी नाही व निरनिराळी व्रतेही करण्याची आवश्यकता नाही. परंतु नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रतांची आवश्यकता आहे.
संसारात व उद्योगधंद्यात गुंतलेल्या माणसाला नामाचा अभ्यास करण्यास पुरेशी संधी नसते. तीर्थाला जाण्याने मनाला अखंड नामस्मरणाची साधकाला सवय लावता येते व तेच वळण तो घरी परत आल्यावर कायम रहाते. त्याचप्रमाणे तीर्थांना गेल्याने साधुसंतांच्या भेटी होऊन मनावर आध्यात्मिक संस्कार दृढ होतात. व्रते करणे हे सुद्धां नामस्मरणाला पोषक असते.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
तीर्थी व्रती भाव धरी रे।
भगवन्नाम हे तीर्थ मात्र फार विलक्षण आहे.
सकलहि तीर्थे प्रयाग काशी।
करितां नामाशी तुळती ना।। *एका जनार्दनी नाम। श्रेष्ठ धामांचेहि धाम।।*
✅ एरवी गंगा नदी ही वरच्या बाजूकडून खालच्या दिशेला वाहते व अंती सागराला जाऊन मिळते. याच्या उलट भगवन्नाम ही ऊर्ध्ववाहिनी गंगा आहे. नामाची गंगा ही देहाच्या सखल बाजूकडून देवाच्या ऊर्ध्व दिशेने वाहत असते.
एरवी तीर्थाला जाण्यासाठी श्रम, वेळ व पैसा खर्च करावा लागतो, तर भगवन्नामाचे तीर्थ साधकाच्या जवळच असल्यामुळे त्यासाठी त्याला काहीच वेचावे लागत नाही. तीर्थात स्नान केल्याने फक्त देह शुद्ध होतो तर भगवन्नामाच्या गंगेत स्नान केल्याने चित्त शुद्ध होऊन देव प्राप्त होतो.
इतकेच नव्हे तर अखंड नामस्मरण करणाऱ्या साधकाचा देह नामाने तुडुंब भरून जातो. तो अंतर्बाह्य पवित्र होतो; किंबहुना अमूर्त असे नाम त्याच्या देहरूपाने मूर्त-साकार झाले असेच वाटू लागते. *तुका म्हणे देह भरला विठ्ठलें।* *कामक्रोधे केलें घर रितें।।*
नामाने तुडुंब भरलेला देह हा तीर्थस्वरूप असतो. इतकेच नव्हे तर तो सर्व तीर्थांचे माहेरघर होऊन राहतो.
धन्य धन्य तें शरीर। तीर्थ व्रतांचे माहेर।।
व पुढे सांगतात *करुणा शांति दया पाहुणा हरि करी।*
चित्त शुध्दीची भगवत्प्राप्तीला अत्यंत आवश्यकता आहे.
दया क्षमा शांती। तेथे देवाची वस्ती।।
किंवा
निर्वैरता सर्वांभूतीं। दया शांती आणि करुणा।।
केली कृपा नारायणे। ऐशी चिन्हें उमटता।।
चित्त शुद्ध झाल्याची खूण म्हणजे या दैवी गुणांची अंत:करणात वस्ती असणे व चित्तशुध्दी नामस्मरणाने सहज होते. तात्पर्य, ….
दैवी गुणांनी युक्त अशा अंत:करणात भगवंत प्रगट होतो, आपण होऊन पाहुणा म्हणून येतो, त्याला निराळ्या आमंत्रणाची आवश्यकता नाही. किंबहुना शुद्ध अंत:करण हेच भगवंताला आमंत्रण होय.
तुकाराम महाराज तेच सांगतात–
नामसंकीर्तन साधन पै सोपे।
जळतील पायें जन्मांतरीची।।
नलगे सायास जाणे वनांतरा।
सुखे येतो घरा नारायण ।।
किंवा
तुका म्हणे चित्त करावें निर्मळ।
येऊनि गोपाळ राहे तेथें।।
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान।
समाधि संजीवन हरिपाठ।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1092