*”छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते!”*
*फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प चौथे*
पिंपरी:
“छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते! त्यांचा इतिहास हा परिवर्तनाचा, क्रांतीचा अन् मानवमुक्तीचा इतिहास आहे!” असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले.
जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजीमहाराज : वर्तमानातील आव्हाने!’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना श्रीमंत कोकाटे बोलत होते. माजी नगरसेविका मीनल यादव अध्यक्षस्थानी होत्या.
व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती सातपुते, अशोक वायकर, जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले की, “शिवाजीमहाराज हे महात्मा फुले यांचे दैवत होते. फुले यांनी महाराजांची दुर्लक्षित समाधी शोधून काढली. त्यांची पहिली जयंती साजरी केली. शिवरायांचा दीर्घ पोवाडा लिहिला.
मात्र, पाठ्यपुस्तकातून खोटा इतिहास शिकवला जातो. पहिले शिवचरित्र केळुस्करांनी लिहिले; आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जय भवानी, जय शिवाजी!’ ही घोषणा सर्वात पहिल्यांदा दिली होती. ‘व्हू वेअर शूद्राज’ या ग्रंथाचा उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र होते. फुले – शाहू – आंबेडकर हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. ॲबे कॅरे, खाफीखान या पाश्चात्त्य अन् मोगलकालीन इतिहासकारांनी शिवाजी आणि संभाजीराजे यांचा वास्तव इतिहास लिहिला आहे.
आपल्याकडील इतिहासकारांनी कविकल्पना रूढ केल्या आणि त्यातून इतिहासाचे विपर्यस्त चित्रण केले. सौंदर्य हे बाह्यरूपावर नसते; तर कर्तृत्वावरून ठरत असते. त्यामुळे शिवाजीमहाराज हे सौंदर्यवान महापुरुष ठरतात. शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी आपल्या खाजगी अन् सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव पाळला नाही.
कुणब्यांचा पोशिंदा असा त्यांचा लौकिक होता. या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळात जो भेदभाव पाळला जातो, तो भूषणावह नाही. आपल्या देशातील एक उद्योगपती पत्नीला साडेतीनशे कोटींचे विमान भेट देतो अन् दुसऱ्या बाजूला नव्वद टक्के जनता आपल्या पत्नीला साडेतीनशे रुपयांची साडी घेऊ शकत नाही, इतकी कमालीची असमानता आपल्या देशात आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होईपर्यंत आरक्षण आवश्यक आहे.
‘मराठा’ ही विशिष्ट जात छत्रपतींना अभिप्रेत नसून अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार मिळून ‘मराठा’ ही त्यांची संकल्पना होती.
बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांनी मानवतेचा धर्म जगाला शिकवला. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे सर्व थोतांड आहे. शिवकाळातही दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती होत्या; परंतु कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. शेतकरी जगला पाहिजे, असे महाराजांचे धोरण होते. शून्य टक्के व्याजाने कर्ज देणारा शिवाजी हा जगातील एकमेव राजा होता. शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लावू नका, असे त्यांचे धोरण होते.
आताच्या काळात मात्र शेतकऱ्यांकडे काडीदेखील शिल्लक राहायला नको, असे धोरण आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांना कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मान्य नव्हती. हल्ली मात्र माणसे उच्चशिक्षित असूनही अंधश्रद्धा पाळतात, मुहूर्त पाहतात. शत्रूंच्या स्त्रियांनाही त्यांनी कायम आदर, सन्मान दिला. त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे.
ती विरोधकाची आई, बहीण, पत्नी असली तरी तिचा मान राखला पाहिजे, हे शिवचरित्रातून शिकायला पाहिजे. शिवकाळात भ्रष्टाचाराला स्थान नव्हते; परंतु आधुनिक काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे!” प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या विस्तृत व्याख्यानातून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासातील अनेक प्रसंगांचे दाखले देत वर्तमान काळातील विविध आव्हानांचा ऊहापोह करीत त्यांचा सामना करण्यासाठी शिवचरित्रच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
व्याख्यानापूर्वी, बालशाहीर वेदान्त अडसूळ, प्रा. दिनेश भोसले आणि सौ. सातपुते यांनी अनुक्रमे पोवाडा, गझल आणि कवनाचे सादरीकरण केले. मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, “फुले – शाहू – आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा वारसा जपणारा, वस्तुनिष्ठ इतिहास समाजासमोर यावा म्हणून आवर्जून या व्याख्यानाचे आयोजन केले आहे!” अशी भूमिका मांडली. मीनल यादव यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “अभिमानास्पद इतिहास कळण्यासाठी व्याख्यानमाला ही काळाची गरज आहे!” असे मत व्यक्त केले.
जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. इब्राहिम खान यांनी आभार मानले.
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची आमदार शेळकेंवर तीव्र टीका
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी