राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेत अभिजित जाधव प्रथम
पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या वतीने कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत अभिजित जाधव (सातारा) या युवकाने प्रथम क्रमांक पटकावला; तर मयूरी गायकवाड (पुणे) आणि समृद्धी रानडे (रत्नागिरी) या युवतींनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले. मेजर विनीत कुमार, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, सचिव सागर पाटील, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम ₹१००००/- (रुपये दहा हजार), ₹५०००/- (रुपये पाच हजार) आणि ₹३०००/- (रुपये तीन हजार) तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच अंतिम फेरीतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धा २०२३ साठी वय वर्षे १८ ते ३० या गटातून महाराष्ट्रातील विविध भागांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. ‘जंगले’ , ‘जलसंवर्धन’ आणि ‘प्लास्टिकचा भस्मासुर’ या तीन विषयांवरील ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये युवतींची संख्या लक्षणीय होती. त्यातून अंतिम फेरीसाठी अकरा स्पर्धकांची प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवड करण्यात आली; आणि तीन विजेते घोषित करण्यात आले.
याप्रसंगी मेजर विनीत कुमार यांनी, “पुणे परिसरातील हिरवाई मनाला सुखकर वाटते; तर पर्यावरणाविषयी जागृत असलेली संस्था अन् तरुणाई मनाला दिलासा देते आहे!” असे गौरवोद्गार काढले. तीन परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यामध्ये डॉ. विश्वास येवले यांनी, “स्पर्धकांचे वक्तृत्व उत्तम असलेतरी कृतिशीलतासुद्धा महत्त्वाची आहे!” असे मत मांडले. डॉ. रवींद्र जायभाय यांनी, “विज्ञान आणि जागृती हे पर्यावरणाचे दोन ठळक पैलू असून स्थानिक ते जागतिक पातळीवर त्यांचा अभ्यास करावा!” अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. शैलजा सांगळे यांनी, “राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या वतीने युवकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी; तसेच पर्यावरण जतन अन् संवर्धनाबाबत असलेले विचार जनमानसात पोहोचावेत या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. सदर स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते अन् त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ही समाधानाची बाब आहे!” अशी भावना व्यक्त केली.
डॉ. सुजाता बाउस्कर आणि सुनील गुरव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. दीपक पंडित, शैलेश भिडे, दीपक नलावडे, भास्कर रिकामे आणि निसर्गमित्र विभागाच्या अन्य सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विनीत दाते यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मापारी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष