वडगाव मावळ:
ज्ञानपीठ विजेते, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून वडगाव शहरातील लहानांपासून ते मोठ्यांसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अनोख्या संकल्पनेतून लायब्ररी सुरू करण्यात आली आहे.

वडगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ नव्हे पुस्तक भेट द्यावे अशी संकल्पना शहर वासियांसमोर मांडून त्यांनी केलेल्या आवाहानास प्रतिसाद देऊन शहरातील अनेक नागरिकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त सुमारे १८७ प्रकारचे विविध ग्रंथ, कादंबरी अशी अनेक पुस्तके भेट दिली.

त्याबद्दल नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले.सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या पुस्तक भेटीतून ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त शहरवासियांसाठी ढोरे यांनी  स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयात लायब्ररी ची सुरुवात केली आहे.

तसेच येणाऱ्या एक ते दोन महिन्यात वडगाव शहरातील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात ग्रंथालय / अभ्यासिकाचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.पुस्तके आपल्याला ज्ञानासोबतच उत्तमोत्तम विचार,आयुष्यं बदलण्याची, परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देत असतात.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आपले कर्तृत्व समजून अशा प्रकारच्या पुस्तक रुपी ज्ञानातून वाढदिवस साजरा केले पाहिजे. मोठ्यांचे अनुकरण छोटे करतात यामुळे हेच अनुकरण येणारी जी पिढी आहे ती करेल आणि आपल्या देशाची भविष्य उज्वल होत जाईल.

वडगाव शहरातील ज्या कोणी पुस्तकप्रेमींना वाचनासाठी पुस्तके हवे असतील त्यांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!