मावळ तालुक्यातील पुसाणे ठरणार देशातील पहिले सोलर उर्जा वापरणारे गाव
तळेगाव दाभाडे:
गेल्या पस्तीस वर्षांपासून गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध… गावात बंदिस्त सांडपाणी व्यवस्था…,शुध्द पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर प्लॅट…, डिजिटल शाळा…घरोघरी शौचालय,… गावातील काँक्रिटीकरण असलेले अंतर्गत रस्ते….अशा एक ना अनेक योजना राबवून स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल करणारे पुसाणे गाव देशातील पहिले सौरऊर्जा वापरणारे गाव ठरणार आहे.

ही गोष्टी  गावाला जितकी  अभिमानाची तितकीच  तालुक्याला अभिमानाची आहे. मावळ तालुक्यातील पुसाणे गावाला आता सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव म्हणून मान मिळणार आहे.सध्या या गावामध्ये भव्यदिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प कार्यान्वित होत असून त्यामुळे पुसाणे गावाची विजेची समस्या पुर्णपणे सुटणार आहे.

ग्रामीण भागाला विजेची समस्या पाचवीलाच पुजलेली असते. कधी आठ तास तर कधी बारा तास ग्रामीण भागातून विज गायब होत असतेच.खंडित अथवा अपु-या दाबाने होणा-या वीज पुरवठय़ाचा अनुभव आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळातील प्रत्येक गावाने घेतलाच आहे .सण समारंभ असो की, लग्न सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह असो की अन्य कार्यक्रम वीजेची बत्ती गुल होणे काही नवीन नाही.

  पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीने विजेचे खांब कोसळणे,रोहित्र नादुरुस्त होणे अशी समस्या निर्माण झाली तर आठ-आठ दिवस गावांमधून विज गायब असते. यावर पर्याय म्हणून तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष व पुसाणे गावचे सुपुत्र किशोर आवारे,गावचे सरपंच संजय आवंढे यांच्या प्रयत्नातून व एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 
त्यापासून रोजची चाळीस किलोवॅवीजनिर्मिती ी होणार असून त्यामुळे गावातील रस्त्यावरील लाईट,शाळा,ग्रामपंचायत कार्यालय,मंदीरे,गावाला पाणीपुरवठा करणा-या उपसा योजनेच्या मोटारींसाठी २४ तास विजपुरवठा होणार आहे.भविष्यात संपुर्ण गावातील कुटुंबांना सुध्दा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प उभारणीसाठी ग्रामस्थ पोपट वाजे,गोरख रावडे व गुलाब वाजे यांचे ही मोठे सहकार्य लाभले. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सोलर सिस्टीम यंत्रणा उभी करण्यासाठी २० लाख रुपये खर्च केले तर विदेशी कंपनीने यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.यामध्ये केवळ सोलर सिस्टीमच नाही तर बॅटरी बॅकअप,आणि जनरेटर बॅकअप देखील या सोलर सिस्टीम प्रकल्पाला देण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा वीजपुरवठा सुरळीत राहणार असल्याने विजे अभावी पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून तसेच विद्यार्थी सुध्दा अभ्यासापासुन वंचित राहणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण  आहे.

error: Content is protected !!