कैवल्यधाम योग संस्थेत मावळातील पत्रकारांसाठी तणावमुक्ती व योगा कार्यशाळा
लोणावळा :
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेत लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील पत्रकारांची तणाव मुक्ती व योगा ही कार्यशाळा संपन्न झाली. मावळ तालुक्यातील पत्रकार बहुसंख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कैवल्यधाम योग संस्था यावर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त पत्रकारांकरिता कैवल्यधाम योग संस्था व लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

      कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव सुबोध तिवारी, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, जेष्ठ पत्रकार सुरेश साखळकर, श्रीराम कुमठेकर, संजय पाटील, डॉ. शरद भालेकर, डॉ. नीता गाडे व बंडू कुटे या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली  यावेळी प्रास्ताविक सादर करताना सुबोध तिवारी यांनी कैवल्यधाम या योग संस्थेची मागील शंभर वर्षातील वाटचाल व शतकमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती दिली.
     
        स्वामी कुवल्यानंद यांनी १९२४  साली कैवल्यधाम या योग संस्थेची स्थापना केली. आज जगभरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून योगाचा प्रचार व प्रसार केला जात आहे. शतक महोत्सवी वर्षातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील पत्रकारांकरिता योगाची कार्यशाळा आयोजित करत कैवल्यधाम संस्थेकडून स्थानिक पातळीवर योगाची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
       
सामाजिक बांधिलकी जपत अहोरात्र काम करणारा पत्रकार याचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी टाळण्याकरिता त्यांनी दिवसभरातील काही वेळ स्वतःकरिता, स्वतःच्या शरीर स्वास्थ्य करिता द्यावा अशी अपेक्षा यावेळी सुबोध तिवारी यांनी व्यक्त केली. तसेच डॉ. शरद भालेकर व डॉ. नीता गाडे यांनी साध्या सोप्या शब्दांमध्ये व कमी वेळेमध्ये करता येणारे योगाचे प्रकार व त्यामुळे शरीराला होणारे फायदे याची  माहिती तसेच प्रशिक्षणार्थींच्या मार्फत प्रात्यक्षिके करून दाखविली. सोबतच उपस्थित पत्रकारांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.

     यावेळी बोलताना सुरेश साखळकर व विशाल विकारी यांनी पत्रकारांचे शारीरिक स्वास्थ्य राखण्याकरिता कैवल्यधाम योग्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. तसेच योगाचा दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश करण्याचा मानस सर्व पत्रकारांच्या वतीने व्यक्त केला. विशाल पाडाळे यांनी स्थानिक पातळीवर योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
    
कार्यशाळेनंतर कैवल्यधाम योग संस्थेच्या गोशाळेला व विविध विभागांना पत्रकारांनी भेटी देत संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. कार्यशाळेला उपस्थित पत्रकारांचे आभार बंडू कुटे यांनी मानले.

error: Content is protected !!