मी ऋणी आहे त्या परमपित्या परमात्म्याचा…
आज डॉक्टर म्हणून मी चांगलं कमावतो आहे! परमानंद प्रदान करणाऱ्या सगळ्या  सुख सोयींचा मी उपभोग घेतो आहे पण ..जेव्हा मी हातावर पोट असणाऱ्या बेरोजगाराना बघतो  तेव्हा मी त्या परम पित्याचे आभार मानतो .

की, मी आहे तसा सुखी आहे… मला आई वडील होते.. भाऊ आहेत, बहीण आहे .काका , मामा, मावशी, सगळे नातेवाईक आहेत. मित्रपरिवार ही आहे, पण जेव्हा मी माझ्याच परिसरातील अनाथांना बघतो.तेव्हा मी त्या परमेश्वराचे आभार मानतो ,मी आहे तसा सुखी आहे.

सावलीत अत्यंत आराम खुर्चीत मी अनेक पेशंट बघतो. आठ आठ तास काम करतो. पण जेव्हा माझी पाठ दुखायला लागते तेव्हा मी चिडचिड करतो.पण बारा बारा तास शेतात राबणारा शेतकरी, हमाली करणारा माथाडी कामगार ४०  व्या मजल्यावर जीवाची परवा न करता पेंटिंग करणारा कारागीर मी आठवतो.

तेव्हा  मात्र  मी त्या करुणानिधीचे आभार मानतो की,मी आहे तसा सुखी आहे. कधी कधी वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी करण्याचं मला स्वातंत्र्य नाही. मला खूप बंधन आहेत. पेशंटच्या उपचारासाठी मला थांबव लागत.मला कुठे जाता येत नाही.पण जेव्हा मी वर्षानुवर्ष तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्याला आठवतो आणि मग मात्र मी आभार मानतो देवाचे की, मी आहे तसा सुखी आहे.

एखाद्या सणाला क्वचित मला नवीन कपडे घेता आले नाहीत. थंडीत शाल स्वेटर सापडलं नाही तेव्हा मन नाराज होतं. तेव्हा मी उन्हात होरपळणाऱ्या…थंडीत कुडकुंडणाऱ्या….रानावनात उघड्यावर झोपणाऱ्या आपल्याच बांधवांना जेव्हा मी आठवतो तेव्हा नकळत त्या परम पित्याचे मी आभार मानतो की,मी आहे तसा सुखी आहे.

आज मी मोठ्या शहरात राहतो आहे.माझ्या डोक्यावर छप्पर आहे. कधी कधी वाटतं आणखी मोठा टू बीएचके, थ्री बीएचके सजवलेला  फ्लॅट असावा.. देखणा टुमदार बंगला असावा… तेव्हा मी रस्त्यावर राहणाऱ्या, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर, फुटपाथ वर झोपणाऱ्या बेघर लोकांना बघतो आणि देवाचे खरोखर मनापासून आभार मानतो की,मी आहे तसा सुखी आहे.

मित्रांनो काय पटतंय ना?– कारण आपल्याच मनातल्या गाभाऱ्यात उमटणारे भाव भावनांचे तरंग मी फक्त व्यक्त केले आहेत इतकच!
( शब्दांकन- डाॅ. शाळिग्राम  भंडारी तळेगाव दाभाडे पुणे)

error: Content is protected !!