नाती :  जीवन प्रवासातील विविध अविष्कार.
        मित्रांनो ,
       ज्या क्षणी आपला गर्भात प्रवेश होतो ,त्या क्षणापासून  आपण  शेवटचा श्वास घेईपर्यंत आपल्याला अनेक नात्यांना सामोरे जावं लागतं, किंबहुना जरी त्या बाळाची नाळ आईपासून तुटली तरी ते नातं शेवटपर्यंत त्याला निभावाव लागतं . काही नाती परमेश्‍वरानेच निर्माण केलेली आहेत ,ती रक्ताची नाती आपल्या जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला साथ देतात ,सोबत करतात पण काही नाती मानवनिर्मित असतात ती प्रेमाची असतात ,श्रद्धेची असतात, कर्तव्याची असतात, उपकाराची अपकारची  असतात, त्याला सुद्धा वेगवेगळी रूपे आहेत, पैलू आहेत .
      
     आमचा कवी असा म्हणतो की
” **प्रेमाचे लक्षण* ,
  *भारी विलक्षण*
   *जैसि ज्याची दृष्टी*
    *तैसा प्रगटे नारायण**
*रक्ताच्या नात्याने उपजेंना प्रेम*
*तेथे पटलि पाहिजे अंतरीची खुण* “.
*
      रक्ताच्या नात्यामुळे भाऊ– बहिण ,काका –मामा ,आत्या– मावशी ,पती-पत्नी पिता-पुत्र हे तर प्रेम करतील यात शंका नाही, पण  जेथे अंतकरणाची   खूण पटते तेथे एक नातं निर्माण होतं ते अबाधित असतं, अतूट असतं,
असं म्हणतात की,
  ” *रास्ते चलते चलते रिश्ते बन जाते है* ,
*मगर कभी* – *कभी रिश्ते निभाते*
   *निभाते रास्ते ही बदल जाते है* “
      म्हणून नातं निर्माण करणं ते निभावणं हे  शेवटी प्रत्येकाच्या हातात असतं .
    *आजच्या गर्दी गोंधळात बहु गर्दीत खरी नाती निर्माण होणं ही भाग्याची गोष्ट आहे* .
      ही जर प्रेमातून निर्माण झाली असली तर ही अबाधित कालातीत असतात.
     
    काही नाती तर माणसाच्या पलीकडे जाऊन मूक  प्राण्यांशी सुद्धा निर्माण करता येतात.
     आपण पाळीव कुत्र्या वरती, मांजर, गाय ,म्हशी वरती मुलांसारखं प्रेम करत असतो व त्यांना त्यासाठी जीवाला जीव देणारी अशी व्यक्तीमत्त्व आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो.
    पण अजून एक सांगू , *नाती जपण्यासाठी नीती मात्र चांगली हवी कारण नीती आणि नात्यात एक वेलांटी चा जरी फरक असला तरी  भ्रष्ट झाल्यास नातं टिकू शकत नाही .* **ते संपायला वेळही लागत नाही* .
   *किंबहुना नात्याची पवित्र इमारत नीतीच्या  भक्कम पायावर उभारलेली असते* .*
        मित्रांनो चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जुलै महिन्याचे दिवस होते मी धुळे कॉलेजला शिकत होतो.
     कॉलेजमधून घरी येत असताना भयंकर पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याचे दिवस पाउस काही थांबायला तयार नव्हता म्हणून पावसापासून बचाव करण्यासाठी मी रस्त्या– लगत असलेल्या घराच्या व्हरांड्याखाली थांबलो ,माझ्या शेजारी माझ्याच वयाचा एक तरुण मुलगा पावसापासून बचाव करण्यासाठी येऊन थांबला मी त्याला ओळखत नव्हतो तो ही मला ओळखत नव्हता  पण त्याच्या हातात कॉलेजचीच काही पुस्तकं होती.
    
     तो आमच्याच कॉलेजचा असावा ,असे वाटून मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्याचे नाव विचारलं .
  ‘ मी मोहन जोशी ‘तो म्हणाला!
       मी मूळचा शहापूरचा राहणारा पण माझ्या बहिणीकडे शिकायला आलेलो आहे .
  मी ही त्याला माझे नाव सांगितले ….
मी शालिग्राम भंडारी मी एरंडोल चा राहणारा मी मावशीकडे शिकायला आलेलो आहे .
    थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या पाऊस थांबला आणि आम्ही आपापल्या घरी परतलो.
     चाळीस पंचेचाळीस वर्षे झाली त्या क्षणापासून आजपर्यंत जे आमचं मैत्रीचं नातं जुळलं ते आज पर्यंत अधिकच घट्ट होत गेलं पुढे , आमचं शिक्षण झालं लग्न झाल संसार झाला एकमेकाचे साक्षी म्हणून जगलो आणि एक सच्चे मित्र बनलो मैत्रीच एक नातं आमच्यात निर्माण झालं.
    
       मी या नात्याकडे ज्यावेळेला वळून बघतो त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं ,नक्कीच *येथे कुठलाही स्वार्थ नाही  एकमेकांविषयी आपुलकी  आहे, एकमेकांविषयी निष्ठा आहे ,तिथेच नाती टिकली जातात ,निभावली जातात* .
      ज्ञानेश्वर माऊली तर याच्या पुढे जाऊन असे म्हणतात ..
*”जे जे भेटे भूत*
*ते ते जानिजे भगवंत”.*
      जेथे भक्तांच भगवंतांचं नातं जगनमान्य आहे पण जो मनुष्य– प्राणी नव्हे प्राणीच आहे ,त्याच्यात तुम्ही परमेश्वर पहा त्याच्याशी तुम्ही भक्त आणि भगवंताचे नातं निर्माण करा असा उत्तम आदर्श संदेश माउलीने त्या ओवीत दिला आहे .
      *”निस्वार्थ प्रेमाने ,ऋणानुबंधाने जी नाती जोडली जातात, ती नाती मनाला खूप समाधान देऊन जातात”* आणि ही नाती मग ती कुठल्याही रुपात असोत गुरु शिष्य ,डॉक्टर– रुग्ण ,मित्र-मैत्रिणी ,पती-पत्नी ,भाऊ –बहीण ,पिता-पुत्र अशा कुठल्याही रूपात असो ती तुम्हाला हवी हवीशी वाटायला हवी .
      *
     किंबहुना तुम्हाला आधार देणारी ,समर्थपणे संकट काळात तुमच्या पाठीशी उभी राहणारी अशी वाटली पाहिजे ,मग खर्‍या अर्थाने तुमचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
    *जमीन– जुमला, पैसा–अडका या संपत्तीपेक्षा नात्याची संपत्ती ही प्रत्येक व्यक्तीची जबरदस्त शक्ती आहे आणि ज्याने   मिळवली त्याच्यासारखा श्रीमंत तोच असू शकतो ,कारण ही नात्याची   संपत्ती कोणीच चोरू शकणार नाही, मागणार नाही किंवा विभागली जाणार नाही* .
    म्हणून ज्यांनी चांगल्या हेतूने नाती निर्माण केली नुसतीच निर्माण केली नव्हे तर  आपल्या प्रेमातून -त्यागातून प्राप्त करून दिली तर ती त्याला त्याच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत तृप्तता, समाधान ,आनंद  देतच राहणार आहे .
     मनुष्य हा समाजशील प्राणी आहे .असं नेहमी म्हटलं जातं आणि त्या समाजशील प्राण्याला उत्तम जीवन जगायचं असेल तर उत्तम नात्याची आवश्यकता आहे.
    
   म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,
*मी अविवेकाची काजळी**
*फेडूनी विवेकदीप उजळी*
  *तो योगिया पाहे ,दिवाळी निरंतर** …
      मी आयुष्याचा प्रवास करताना अविवेकाची काजळी पुसून, विवेकाचा दीप  उजळण्याचा प्रयत्न केला तर दिवाळी केवळ चार दिवसांची नव्हे तर निरंतर दिवाळी अनुभवणारा असा योगीच होणार आहे .
     आजचा विषय आपल्या
सर्वांपर्यंत पोहोचला असेलच म्हणून इथेच थांबतो .
  (  ला. डॉ.शाळिग्राम भंडारी) 

error: Content is protected !!